| नागपूर | प्रतिनिधी |
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन 17 मार्च रोजी नागपूरमध्ये दोन गटात हिंसाचार झाला. या हिंसाचारात इरफान अन्सारी (38, रा. गरीब नवाज नगर) हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याचा आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणात आरोपींची संख्या 105 झाली आहे. आरोपींमध्ये 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. हमीद इंजिनिअरवर हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप आहे. हमीद इंजिनिअर मायनॉरीटी डेमोक्रॅटीक पक्षाचा कार्याध्यक्ष आहे.
नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेकडून दोन प्रकरणांची चौकशी सुरु आहे. या हिंसाचार प्रकरणात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेल्या फहीम खानने जामिनासाठी अर्ज केला आहे. फहीम खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होईल. डीसीपी हल्ला आणि महिला विनयभंगाचं प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे. नागपूरमधील हिंसाचार 20 दुचाकी, 40 चारचाकीचे नुकसान झाले तर 2 क्रेन जाळण्यात आल्या. उड्डाणपुलाच्या कामासाठी असणार्या क्रेन जाळण्यात आल्याने सुमारे 70 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा कंस्ट्रक्शन कंपनीचा दावा आहे.