इमारत जीर्ण झाल्याने खारघरमध्ये हलविले कार्यालय
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली लोखंड आणि पोलाद बाजारातील पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु असलेली इमारत पनवेल पालिकेने धोकादायक ठरवल्याने आरटीओचे कार्यालय दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता खारघर सेक्टर 36 येथील सिडकोच्या व्हॅली शिल्प इमारतीमधील जागा निश्चित करण्यात आली असून, येत्या काही दिवसात टप्प्या-टप्प्याने कळंबोली येथील आरटीओचा कारभार खारघर येथे हलवण्यात येणार आहे.
2010 साली स्थापन करण्यात आलेल्या पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाच्या कारभाराकरिता कळंबोली येथील केंद्रीय सुविधा भवन इमारतीत 2011 साली कार्यालय सुरु करण्यात आले होते. जवळपास 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतीची दुरवस्था झाल्याने लोखंडी पाईपाचा टेकू देऊन हे कार्यालय सुरु होते. पनवेल पालिकेच्या स्थापनेनंतर धोकादायक ठरवण्यात आलेल्या या इमारतीतील कार्यालय दुसर्या ठिकाणी हलवण्याचा हालचाली प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, कार्यालयाकरिता योग्य जागा उपलब्ध न झाल्याने अखेर खारघर येथील सेक्टर 36 येथे सिडकोच्या मालकीच्या असलेल्या व्हॅली शिल्प इमारतीमधील जागा निश्चित करण्यात आली असून, सिडको आणि प्रादेशिक परिवहन विभागात झालेल्या भाडेकरारानुसार पुढील 12 महिन्यांसाठी 46 लाख 64 हजार 443 भाडे आकारण्यात येणार आहे.
कार्यालय गाठण्यासाठी कसरत
आरटीओ कार्यालय सुरु करण्यासाठी खारघर सेक्टर 36 येथील ज्या इमारतीमधील जागा निश्चित करण्यात आली आहे, ती इमारत वसाहतीपासून काहीशा बाहेरच्या बाजूस आहे. त्या इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी खारघर नवी मुंबई परिसरातून एनएमएमटी बसची सुविधा आहे. मात्र, पनवेल परिसरातील नागरिकांना कार्यालय गाठण्यासाठी खासगी रिक्षा सेवेची मदत घ्यावी लागणार असल्याने कार्यालय गाठण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागणार आहे.