कर्जतच्या 21 केंद्रातून निघणार क्रांतीज्योत

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा 2 जानेवारी रोजी 83 वा स्मृतिदिन साजरा होणार आहे. या स्मृतिदिनाच्या निमित्ताने कर्जत तालुका शिक्षण विभाग यांच्याकडून हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी शिक्षण विभागाच्या कर्जत तालुक्यातील 21 केंद्र यांच्या वतीने क्रांतीज्योत मानवली येथे नेली जाणार आहे.

मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे सकाळी पोहचणार आहेत. तालुक्यातील माथेरान येथील हुतात्मा भाई कोतवाल आणि मानिवली येथील हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांचा 2 जानेवारी 1943 रोजी ब्रिटिशांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांचा बलिदान दिन रायगड आणि ठाणे जिल्ह्यात 2 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या सोहळ्याच्या निमित्ताने कर्जत तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. शिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी या वर्षीपासून हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 2 जानेवारी रोजी तालुक्यात असलेल्या केंद्र स्तरावरून क्रांतीज्योत रॅली काढून अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील 240 प्राथमिक शाळा यांच्या साठी 21 केंद्र असून, या केंद्रांच्या माध्यमिक विभागातील शिक्षक यांच्याकडून ही क्रांतीज्योत रॅली त्या- त्या केंद्रातून 2 जानेवारी सकाळी निघणार आहे आणि सकाळी साडे नऊ वाजता मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मारकात पोहचणार आहे. हा नवीन उपक्रम गटविकास अधिकारी सुशांत पाटील आणि गटशिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी सुरु केला आहे. शिक्षण विभागाच्या नेरळ, दहिवली माले, वैजनाथ, खांडपे, वाकस, कशेळे, चिंचवली, भिसेगाव, पाथरज, जांभिवली, कर्जत, वारे, कळंब, जामरूख, खांडस, नांदगाव, भोईरवाडी, शेलू, कडाव, बेकरे, दहिवली वरेडी आदी केंद्रातून क्रांतीज्योत निघणार आहे. कर्जत तालुक्यात असलेल्या 240 प्राथमिक शाळांमध्ये गेली 20 वर्षांपासून हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी प्रभात फेरी काढली जात असते.

Exit mobile version