पुराचा प्रश्‍न सोडवला नाही; रेलरोको मध्यरेल्वे प्रशासनाला दिला इशारा

। कर्जत । वार्ताहर ।
‘कर्जत-पनवेल रेल्वे लाईन टाकल्यापासून या परिसरातील शंभरच्यावर कुटुंबांना दर पावसाळ्यात जीव मुठीत धरून रहावे लागते. पावसाळ्यात तीन-चार वेळा पाणी येत असल्याने या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. ही समस्या दूर करण्यासाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला परंतु पावसाळा दीड महिन्यावर आला तरी अद्याप काहीही ठोस उपाय योजना केली नसल्याने या परिसरातील पुराच्या पाण्याचा प्रश्‍न मध्यरेल्वे प्रशासनाने सोडविला नाही तर कर्जत रेल्वे स्थानकावर 15 जून नंतर कधीही रेलरोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मध्यरेल्वे प्रशासनाला दिला आहे.
तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ज्ञानदीप वसाहतीमध्ये कर्जत-पनवेल रेल्वे लाईनमुळे नेहमीच पुराचे पाणी येते. गेली पंधरा-सोळा वर्ष या पाण्याचा बंदोबस्त करावा म्हणून येथील रहिवासी मध्यरेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करीत होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर हा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी हाती घेतला आणि त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे विविध माध्यमातून पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकारी पाहणीसाठी आले. त्यावेळी तेथील रहिवाशांनी आपल्या समस्या मांडल्या. तरीही ठोस उपाय योजना होत नव्हती. नंतर ओसवाल यांनी पुन्हा पाठपुरावा सुरू केला आणि रेल्वे प्रशासनाने सभा आयोजित केली.
13 नोव्हेंबर 2021 रोजी ज्ञानदीप वसाहतीतील महेंद्र देशमुख यांच्या निवासस्थानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. आता दीड महिन्यावर पावसाळा आला आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याची भीती तेथील रहिवाशांना वाटत आहे. आमच्या भावना रेल्वे बोर्डाला कळवाव्यात तसेच 31 मे 2022 पूर्वी रेल्वे महाव्यवस्थापकांनी तातडीची सभा आयोजित करावी. 10 जून पर्यंत याबाबत ठोस उपाय योजना करावी. अन्यथा 15 जून नंतर केव्हाही कर्जत रेल्वे स्थानकात रेलरोको आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल. असा इशारा आ. थोरवे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन पाठवून दिला आहे. यावेळी पंकज ओसवाल,संतोष सांबरी, बिपीन बडेकर, पंकज पाटील, संकेत भासे, अनिल व्हजगे, राहुल वैद्य, केतन बोराडे आदींसह रहिवासी उपस्थित होते.

Exit mobile version