अभेद्य जंजिर्याचे विद्यार्थ्यांना आकर्षण
| मुरूड | प्रतिनिधी |
गुलाबी थंडीतील पर्यटन आणि जंजिरा जलदुर्ग पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून मुरूड तालुक्यात शैक्षणिक सहलींचा मोठा ओघ सुरू झाल्याचे गेल्या दोन दिवसापासून दिसून येत आहे.
बीड, लातूर, सातारा, नाशिक, सटाणा, सांगोला, कोल्हापूर, पुणे, सिन्नर, औरंगाबाद, अहमदनगरसहित अनेक भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एसटीमधून येथील पर्यटन स्थळांवर दाखल झाल्याचे दिसून येत आहेत. साळाव येथील बिर्ला गणेश मंदिर, बारशिव येथील रॉक बीच, कोर्लई किल्ला, नांदगावच श्री सिद्धिविनायक देवस्थान, जंजिरा जलदुर्ग, पद्मजलदुर्ग, खोरा जेट्टी, आगरदांडा जेट्टीचा परिसर, काशीद, नांदगाव, मुरूड येथील समुद्रकिनारे पाहण्यासाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींची पसंती दिसून येत आहे. जे प्रथमच समुद्र पाहत आहेत, त्यांचा मात्र आनंद गगनात मावेनासा होत असल्याचा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. समुद्रकिनारी भागात विद्यार्थ्यांची आयोजकांकडून काळजी घेत असल्याचे देखील दिसून येत आहे.
विविध स्थळांचे आकर्षण
गेल्या आठवड्यात पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून सहली आल्या होत्या. आता मराठवाड्यातून सहलीचा ओघ सुरू झाला आहे. दिवसागाणिक सहलींच्या एस टी बसेसची संख्या वाढती आहे. सर्व सहली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बसने येत असल्याचे दिसत आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर, येथील निसर्ग रम्य, ऐतिहासिक स्थळे आणि धार्मिक स्थळांची माहिती देऊन विद्यार्थ्यांचे ज्ञान वृद्धिंगत करण्यावर भर असल्याचे मंगळवारी आयोजक शिक्षकांनी मुरूड समुद्रकिनारी बोलताना सांगितले.
कोरोना पसरल्याने गेल्या दोन वर्षात बाहेरील सहली वर निर्बंध होते. आता कोरोना मुक्त वातावरण असल्याने कंटाळलेले विध्यार्थी देखील उत्साही आणि आनंदले असून या वर्षी कोकणात पर्यटनस्थळी येणार्या शैक्षणिक सहलींची संख्या तिपटीने मोठी असेल अशी माहीती बीड येथून आलेल्या पुंडलिक खराटे, विजय भदाणे आदी शिक्षकांनी दिली. कोकणातील हिरवागार निसर्ग आणि समुद्रकिनारे खुपच सुंदर असून मनाला निखळ आनंद देतात, अशा प्रतिक्रिया यांनी दिल्या. अलिबाग, नागाव, किहीम, रेवदंडा, चौल, काशीद, नांदगाव, मुरूड कडे आलेल्या या सहलींच्या बसेस मांदाड पुलावरून तळा तालुक्यातील बौद्धकालीन कुडे लेण्यांकडे जातात. तेथून पुढे 25 किमी वरील दिवेआगर, हरिहरेश्वर मुक्कामी जाताना दिसत आहेत. जाताना या पैकी काही सहली मुरुडला देखील मुक्काम करीत असल्याचे दिसून आले. मुरूड आणि श्रीवर्धन हे दोन्ही तालुके निसर्गरम्य समुद्रकिनारी असले तरी डोंगरी तालुके आहेत.