जिल्ह्यात विविध रंगीबेरंगी फुले बहरली
रंगोत्सव पाहण्यासाठी पर्यटक दाखल
। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
वसंत ऋतूचे आगमन नुकतेच झाले आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगा, विपुल वनसंपदा लाभलेल्या रायगड जिल्ह्यात विविध रंगीबेरंगी फुले बहरली आहेत. पाली सुधागड सह जिल्ह्यातील डोंगर रांगा, रस्त्याच्या कडेला, माळरान व जंगल आदी ठिकाणी पळस, पिवळा गुलमोहर, काटेसावर, गिरीपुष्प आदी झाडांना बहर आला आहे. जणूकाही फुलांचा रंगोत्सव येथे सुरू झाला आहे. यामुळे सामान्य नागरिकांसह निसर्ग अभ्यासक देखील सुखावले आहेत. पर्यटक देखील हा रंगोत्सव पाहण्यासाठी आवर्जून येथे थांबतात आणि डोळे भरून विविधरंगी फुलांचा आनंद घेतात.
पाटणुस येथील निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी सांगितले की, निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी लोक आवर्जून थांबतात. फुलांनी बहरलेले ही झाडे अनेक पशुपक्षांना खाद्य व आश्रय देतात. त्यामुळे येथे विविध पक्षांचा किलबिलाट असतो. जैवविविधता देखील बहरते. पालीतील वनस्पती अभ्यासक अमित निंबाळकर म्हणाले की वसंताचे आगमन झाले आहे. जिल्ह्यातील अनेक वृक्षांना पनगळीला सुरुवात झाली आहे. तसेच या ऋतूतील विविध आकर्षक फुले देखील बहरली आहेत. निसर्ग व पक्षी अभ्यासकांना ही पर्वणी आहे. हा नजारा पाहण्यासाठी अनेक पर्यटक देखील याठिकाणी निरीक्षणासाठी आवर्जून येत असतात.
फ्लेम ऑफ द फायर पळस
फ्लेम ऑफ द फायर म्हणून ज्याचे वर्णन केले जाते त्या पळसाची लाल व भगवी फुले खूप बहरली आहेत. डोंगराळ भाग, रस्त्याच्या कडेला आणि शेतांच्या बांधावरील पळसाच्या झाडावर आलेली ही भडक लाल भगव्या रंगाची फुले जनुकाही रंगोत्सव साजरा करत असल्या प्रमाणे भासत आहेत.
मखमली पाकळ्यांचा पांगारा
फेब्रुवारी ते एप्रिल या काळात पांगार्याची फुले फुलतात. फुलांचा लाल रंग आणि मखमली वाटणार्या पाकळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अंगावर जरी काटे असले तरी या 50-60 फुट उंच वृक्षाच्या पानाच्या हिरवाईने त्याचा फुलाच्या लाल रंगाने परिसर रंगेबिरंगी वाटतो. आयुर्वेदात पांगार्याला फार महत्त्वाचे स्थान आहे. याची साल व पाने औषधी गुणधर्म युक्त आहेत.
मनमोहक पिवळा गुलमोहर
याला सोनमोहर किंवा ताम्रशिंपी असे देखील म्हणतात. कळ्या धरू लागल्या की त्यांचे तांबूस तपकिरी भुकटीत घोळवलेल्यासारखे मण्यांसारखे सुरेख दिसतात. मग एकेक मणी फोडून नाजूक पिवळ्या जर्द पिवळ्या कागदासारख्या पाकळ्यांची फुले बाहेर पडू लागतात व हळूहळू सर्व झाड पिवळेधमक होऊ लागते. झाडाच्या तळाशी गळून पडलेल्या फुलांची आणि पाकळ्यांची सजावट होते.
लक्षवेधी काटेसावर
संपूर्ण काट्याने मढलेली असल्याने हिला मराठीत काटेसावर म्हणतात. तर संस्कृतात शाल्मली असे नाव आहे. काटेसावरीची फुले मोठी, पाच पाकळ्या, पाकळ्या जाड आणि रंग गडद गुलाबी, खूप सारे पुंकेसर असलेले असतात. या फुलांना खाण्यासाठी खारुताई जमा होतात. तर फुलांमधून मध गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांची मांदियाळी पहायला मिळते.
भरगच्च बहरलेले गिरीपुष्प
गिरीपुष्प याला ग्लिरिसिडिया असे नाव आहे. हा पानझडी वृक्ष असल्यामुळे पाने गळून गेल्यानंतर फांद्यांच्या टोकांवर निळी जांभळी फुले गुच्छात येतात. फुलांनी बहरलेले गिरीपुष्प झाड फार सुंदर दिसते. या झाडाची फुले शोभेसाठी वापरली जातात. या झाडांच्या बिया उंदरांनी खाल्यास उंदीर मरतात. या झाडांच्या हिरव्या पानांपासून चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत तयार होते.
पांढराशुभ्र देवचाफा
देवचाफ्याची फुले पांढरी असून मध्यभागी पिवळसर झाक असते. खोड राखाडी रंगाचे असते व खोडाला पारंब्या असतात. ही फुले किंवा या फुलांचा हार देवाला वाहतात. म्हणून सहसा हे झाड देवळाबाहेर लावलेले दिसते. हि फुले पांढरीशुभ्र असून मध्यभागी पिवळा रंग नसतो.
