। पनवेल । वार्ताहर ।
उत्तर प्रदेशमधील गोरखपुर जिल्ह्यातील झंगहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघांची हत्या करण्याचा प्रयत्न करून आरोपी फरार झाला होता. आरोपीची माहिती देणार्याला उत्तर प्रदेश सरकारने 50 हजारांचे बक्षीस लागू केले होते. मात्र, तरीही दोन वर्षे उत्तर प्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी गौतम गौड ठिकाण बदलत होता. अशा परिस्थितीत पनवेल शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला शोधून काढून ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलिस आयुक्तअशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल केदार व पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी बदलापुर गाठले. बदलापूरमध्ये एका भाड्याच्या घरातून आरोपीला पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेऊन पनवेल पोलिस ठाण्यात आणले. दरम्यान, पनवेल शहर पोलिसांकडून आरोपीचा ताबा घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.