रायगड जिल्ह्यातील ‘त्या’ 1 लाख 15 हजार 98 विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात?

कोव्हिडमुळे या विद्यार्थ्यांचं नुकसान, वर्षभर शाळेत न गेल्याची अहवालात नोंद
। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने, 1 एप्रिल ते 10 एप्रिल 2021 या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोध मोहीम आयोजित केली होती. यामध्ये कोव्हिडमुळे रायगड जिल्ह्यातील 1 ली ते 12 वीतील 1 लाख 15 हजार 98 विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नसल्याची बाब समोर आली आहे. सध्या रायगड जिल्ह्यात 3 ते 18 वयोगटातील 4 लाख 83 हजार 998 विद्यार्थी असून त्यापैकी शाळेत जाऊ न शकलेली 1 लाख 15 हजार 98 विद्यार्थी असून दाखल न झालेली 20 बालके आहेत. तसेच शाळाबाह्य 65 मुले आहेत. कोव्हिडच्या परिस्थितीमुळे शाळेत जात नसलेल्या त्या जवळपास सव्वालाख मुलांचे भवितव्य अंधारात असल्याचं मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे. कारण ऑनलाईन शिक्षणामुळे संगणक तसेच मोबाईलची सवय झाल्याने फळ्यावरचा अभ्यास गायब झाला आहे. तसेच सतत संगणक व मोबाईलमुळे त्यांच्या डोळ्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. त्यामुळे या मुलांचे पालक चिंतेत असल्याची बाब समोर आली आहे.

राज्यात 3 ते 18 वयोगटातील 1 कोटी 71 लाख 25 हजार 450 मुलांची मोजणी झाली. त्यापैकी 1 कोटी 68 लाख 84 हजार 315 मुलांची शाळेत पटनोंदणी करण्यात आली होती. तर 2 लाख 41 हजार 135 मुलांना शाळेत दाखल केले गेले नव्हते. शाळेत दाखल न केलेल्या मुलांपैकी नाशिक, चंद्रपूर, यवतमाळ, अहमदनगर व पुणे या 5 जिल्ह्यातील मुलांची संख्या 1 लाख 63 हजार 541 एवढी मोठी आहे. कोव्हिड-19 काळात 76 लाख 77 हजार 543 मुले शाळेत जाऊ शकली नाही, असा हा अहवाल सांगतो. राज्याबाहेर स्थलांतर करुन गेलेल्या मुलांची संख्या 66 हजार 740 एवढी आहे. त्याच वेळेला राज्यात इतर राज्यातून स्थलांतर करुन आलेल्या मुलांची संख्या 67 हजार 180 इतकी आहे. राज्यात एकूण 36 जिल्हे असून त्यापैकी औरंगाबाद, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण अधिकार्‍यांनी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केलेले नाही.

शिक्षण विभागाने केलेल्या मोहिमेत राज्यातील 25 हजार 203 शाळाबाह्य मुले आढळून आली. त्यापैकी 10 हजार 177 मुले ही एकट्या मुंबई उपनगरातील आहेत. त्यामध्ये 13 हजार 84 मुले तर 12 हजार 121 मुलींचा समावेश आहे. त्यापैकी 17 हजार 397 मुले ही अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झाली होती, तर 7 हजार 806 मुले ही कधीच शाळेत गेली नव्हती. कोव्हिड काळात राज्यातील 76 लाख 77 हजार 543 मुले शाळेत जाऊ शकली नाहीत.

रायगड जिल्ह्यातील शाळाबाह्य मुले
कधीच शाळेत न गेलेली – मुले11, मुली- 9
अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य मुले – मुले – 23, मुली – 22
एकूण – 65 त्यापैकी मुले- 34, मुली 31

Exit mobile version