पाच राज्यांचं भवितव्य 18 कोटी मतदारांच्या हातात

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आज निवडणूक आयोगाने करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या नियमावलीचं पालन करूनच पाच राज्यांमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांची देशभर चर्चा सुरू आहे. तिसरी लाट आणि ओमायक्रॉनची भिती या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होती तरी निवडणूक आयोगाने या निवडणुका होणार असल्याचं जाहिर केलं. आयोगाने म्हटले की, “आमची तीन प्रमुख उद्दिष्टे आहेत. पहिलं कोविड सुरक्षित निवडणूक, दुसरं मतदारांना कोणत्याही अडचणीविना मतदानाचा अनुभव आणि तिसरं म्हणजे सर्वाधिक मतदानाची टक्केवारी.”

६९० मतदारसंघात निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७०, उत्तराखंडमधील ७० आणि उत्तर प्रदेशमधील ४०३ निवडणुकांचा समावेश आहे.  उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका टप्प्यांमध्ये होणार असून मणिपूर आणि गोव्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत.

एकूण १८.३ कोटी मतदार या निवडणुकीत सहभागी होतील. त्यापैकी ८.५५ कोटी महिला मतदार आहेत. सर्व पाच राज्यांमध्ये महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. सर्वाधिक २९ टक्के उत्तर प्रदेशात, गोव्यात २४ टक्के, मणिपूरमध्ये १९ टक्के, उत्तराखंड १८ टक्के तर पंजाबमध्ये १० टक्के महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. २४.९ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामध्ये ११.४ लाख महिला मतदार आहेत. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त १२५० मतदार असतील. 

एकूण मतदान केंद्र २ लाख १५ हजार ३६८ आहेत. १६२० मतदान केंद्र हे पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांमार्फत सांभाळले जातील. काही मतदान केंद्र दिव्यांग व्यक्तींकडून हाताळले जातील. दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, व्हीलचेअर्स अशा आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. एकूण ९०० निरीक्षक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवतील.

उमेदवारांनसाठी नियम
उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयी माहिती मिळायला हवी. उमेदवारांना त्याची माहिती द्यावी लागेल. यासंदर्भात वर्तमानपत्र आणि टीव्ही वाहिन्यांवरून प्रचारादरम्यान तीन वेळा याविषयीची माहिती द्यावी लागेल. याशिवाय राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाईटवर होम पेजवर प्रत्येक उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती द्यावी लागेल. तसेच, याच उमेदवाराला का निवडलं, याचं कारण पक्षाला द्यावं लागेल. उमेदवाराची निवड झाल्यानंतर पुढच्या ४८ तासांत ही माहिती द्यावी लागेल.

Exit mobile version