जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी सजग नागरी मंचाचे निवेदन
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील बेलापूर हिल, पारसिक हिल, खारघर हिल आणि शहरातील इतर सर्व नैसर्गिक टेकड्या वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी सजग नागरिक मंचाने जिल्हाधिकारी ठाणे आणि रायगड यांना निवेदनाद्वारे केली आहे.
नवी मुंबई शहराचे पर्यावरण, जैवविविधता आणि भविष्यातील शाश्वत विकास टिकवून ठेवण्यासाठी शहरातील टेकड्यांचे संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. सध्या या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, भूमी समतलीकरण, अवैध बांधकामे आणि भूखंड विक्रीचे प्रकार सुरू आहेत. सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिका या दोन्ही संस्थांनी विकास आराखड्यांमध्ये या टेकड्यांवरील काही क्षेत्रे ‘निवासी’ म्हणून दर्शवून पर्यावरणीय हानीला निमंत्रण दिले आहे. या कृतीमुळे शहराच्या हवामान संतुलनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. सजग नागरिक मंचच्या म्हणण्यानुसार, शहराचे पर्यावरण, जैवविविधता आणि शाश्वत विकास टिकवण्यासाठी या टेकड्यांचे संवर्धन अत्यावश्यक आहे.
भविष्यात नवी मुंबईचे पर्यावरण वाचवायचे असेल तर नवी मुंबईतील पाणथळी क्षेत्रे, कांदळवणे, सर्व टेकड्या तातडीने वनविभागाकडे हस्तांतरित करणे हाच एकमेव मार्ग आहे, या आशयाचे निवेदन नवी मुंबईच्या सजग नागरिक मंचद्वारे रायगड व ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. तसेच, मुख्यमंत्री, वनमंत्री, वन विभागाचे सचिव, सिडको व नवी मुंबई महानगरपालिकेला देखील निवदेन पाठवण्यात आले आहे.
