पनवेल पालिकेची पाच शाळांवर कारवाई
| पनवेल | प्रतिनिधी |
सध्या जिल्ह्यात बेकायदेशीरपणे शाळा चालविण्याचे सत्र सुरू आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात येत आहे. दरम्यान, कोणतीही परवानगी न घेता सुरू असलेल्या शाळांवर पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून बडगा उगारण्यात आला आहे. त्यावेळी तळोजामधील फेस 1 आणि फेस 2 मधील पाच शाळा विनापरवाना चालविल्या जात असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या विरोधात पनवेल पालिकेतर्फे तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
कोणतीही परवानगी न घेता सुरू असलेल्या शाळांवर पनवेल पालिकेच्या शिक्षण विभागाकडून बडगा उगारण्यात आला आहे. तळोजा फेस 1 आणि फेस 2 मधील पाच शाळांविरोधात शिक्षण विभागाकडून तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पालीकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तळोजा फेस 1 आणि 2 येथील काही शाळांची पाहणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणच्या शाळांची पाहणी केली असता येथील पाच शाळा अनाधिकृतरित्या विनापरवाना चालविल्या जात आल्याचे लक्षात आले. याबाबतची माहिती पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांना देण्यात आल्याने त्यांनी अनधिकृतपणे सुरु असलेल्या या शाळांविरोधात विद्यार्थी, पालक आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याबद्दल पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आयुक्तांच्या सूचनेनुसार या शाळांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता शाळा चालवल्या जात असल्याने पालकांनी अशा शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश देऊ नये, अशा सूचना शिक्षण विभागाकडून नेहमीच देण्यात येत असतात. तरी देखील अनेक पालक आपल्या पाल्यांना अशा शाळांमध्ये प्रवेश देतात. अशावेळी पाल्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे माहित असून सुद्धा पालक अशी चूक करत असल्याने बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या शाळा बंद करण्यासाठी शिक्षण विभागाकडून तसे प्रयत्न केले जातात. तसेच, अशा शाळांची यादीच अनेकदा प्रसिद्ध केली जाते. त्यानंतरही या शाळा सुरूच राहत असल्याने अशा शाळांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.
गुन्हे नोंदवण्यात आलेल्या शाळांची यादी
1) काळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल
2) अर्कम इंग्लिश स्कूल
3) ओसीन ब्राईट कॉन्व्हेंट स्कूल
4) बजाज इंटरनॅशनल स्कूल
5) दि वेस्ट हिल हाय इंटरनॅशनल स्कूल.





