गायकवाड कुटुंबिय अजूनही उपेक्षित

संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याची प्रतिक्षा कायमच
तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना
| अलिबाग | प्रतिनिधी |

बाळगंगा नदी प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला गायकवाड कुटुंबियांना मिळाला नाही. गेली अनेक वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे भरपाईसाठी दाद मागत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत हे कुटुंबिय उपेक्षित असल्याचे समोर आले आहे.

पेण तालुक्यातील बाळगंगा नदी प्रकल्पासाठी वाशीवली येथील जमीन संपादित करण्यात आली. येथील अनेक शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली. मात्र, त्याच गावातील गायकवाड कुटुबियांना अजूनपर्यंत मोबदला देण्यात आला नाही. भूसंपादन गट क्र. 4 (1-अ) क्षेत्र 38.4 हे.आर. खाते क्र. 81 ही जमीन दिपक गायकवाड कुटुंबियांची आहे. ती बाळगंगा नदी प्रकल्पाच्या क्षेत्रासाठी संपादित करण्यात आली आहे.

ही जमीन 200 मीटर परिघात येत आहे. त्याप्रमाणे मोबदला देणे आवश्यक असताना, 2015मध्ये प्रसिद्ध केलेल्या निवाड्यामध्ये गायकवाड कुटुंबियांच्या सर्वे नं. 4 (1) अ जमिनीचा समावेश होता. तरीसुद्धा संबंधित तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे सर्वे नंबर गाळण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे गायकवाड कुटुंबिय मोबदल्यापासून वंचित राहिल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

याबाबत 2015 पासून गायकवाड कुटुंबिय लढा देत आहेत. मात्र, अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे घातले असून, त्यांना निवेदन दिले आहे. 2015 मध्ये तत्कालीन अधिकारी यांनी निवाडा तयार करताना त्रुटी ठेवल्याने त्या निवाड्यामध्ये दुरुस्ती करावी, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी, संभाव्य बिनशेतीच्या दराप्रमाणे मूल्यांकन होऊन 2015 पासून व्याजासह आर्थिक लाभ, पुनर्वसनाबाबत प्रयत्न करावे, या प्रमुख मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.

Exit mobile version