| अलिबाग | वार्ताहर |
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात. त्यांची 134वी जयंती जिल्ह्यात सोमवारी (दि.14) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमांसह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड जिल्हा समाज कल्याण विभागाच्यावतीने दि. 8 ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या निमित्ताने सोमवारी (दि.14) भीम पदयात्रा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भीम पदयात्रा समाज कल्याण कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आली.

नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, व जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचा समारोप आंबेडकर चौकात करण्यात आला.

मुरुड तालुका बौद्ध समाज सेवा संघ केंद्रीय समिती आणि स्थानिक तालुका समिती व विभागीय शाखा क्रमांक 1, 2, 3 संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि धम्म संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अलंकापुरी येथील स्मारकाजवळ धम्म ध्वजारोहण व ध्वजवंदना करण्यात आले. तद्नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य पायी व बाईक रॅली काढण्यात आली.

स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंच आणि प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय अलिबाग यांच्या विद्यमाने रामनारायण पत्रकार भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंचाचे अध्यक्ष सखाराम पवार, सल्लागार श्रीरंग घरत, कार्यवाह नागेश कुळकर्णी, उपाध्यक्ष शरद कोरडे, देसाई यांच्यासह माजी नगरसेवक आर.के. घरत, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, संतोष बोंद्रेसर, चारुशीला कोरडे, माजी नगरसेवक बाळुशेठ पवार, मराठा महासंघाचे उल्हास पवार, प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे, जिल्हा रुग्णालयाचे उमेश करंबत, हेमकांत सोनार, झेबा कुरेशी व पप्पू कुळकर्णी आदी उपस्थित होते.

श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला एनएसएस विभागाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य नितीन सुर्वे, राजेंद्र भोसले, शांतीलाल जैन व गोखले शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकार्यांनी समाधान व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हसळा तालुक्यात आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाली. त्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा आणि म्हसळा पोलीस ठाणे यांच्या विद्यमाने म्हसळा पोलीस ठाण्यात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून संयुक्त महोत्सव सोहळा व बोध्दाचार्य-श्रामणेर शिबिराचा सांगता समारोह सावर येथे संपन्न झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बौद्धजन पंचायत समिती शाखा उरण शहर व माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्व समाजातील नागरिकांसह अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून व लोकसहभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणूकीसाठी पनवेल कार्यक्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी उभारलेले चित्ररथ मुख्य आकर्षण ठरले.

लोणेरे विद्यापीठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त स्वराज्य संघटना माणगाव संस्थापक तथा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज तांबे, उतेखोल केंद्रप्रमुख शंकर शिंदे, संभाजी गायकवाड व स्वप्नील शिर्के यांनी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेवदंड्यातील पंचशीलनगर येथे सरपंच प्रफुल्ल मोरे यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाडकर, भारती मोरे, राजेंद्र चुनेकर, संदीप खोत, सुरेश खोत, निलेश खोत, शरद वरसोलकर, विश्वनाथ घरत, चंद्रकांत झावरे, सुराराम माळी, सुहास घोणे व मान्यवर उपस्थित होते.

माणगावातील रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रातवड उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक संतोष कदम, व्याख्याती जान्हवी पालकर व सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.

तळा तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला पोहचला होता. यावेळी जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर जमलेल्या भीम अनुयायांनी तळा शहर भीममय झाले होते. तालुक्यात व शहरात शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आदी विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुतळ्याला अभिवादन करून मानवंदना देण्यात आली. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉ. कारभारी काळे, निलेश गद्रे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद किवळेकर व अधिष्ठता नलबलवार यांच्याहस्ते संपन्न झाले.