माजी सदस्याला ग्रामपंचायतीची नोटीस
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायतीची खांडा गावातील कचरा कुंडी ऐन गणेशोत्सव काळात तोडण्यात आली होती. कोणत्याही परवानगी विना तोडण्यात आलेल्या कचराकुंडी बद्दल स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर आणि उपोषणाची नोटीस दिल्यावर नेरळ ग्रामपंचायतीकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीने कचरा कुंडी तोडणार्या माजी सदस्याला नोटीस पाठवून स्वतःच्या खर्चाने कचरा कुंडी बांधून देण्याचे आदेश दिले आहेत.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील ममदापूर-नेरळ रस्त्यावरील खांडा गावातील गटाराच्या बाजूला असलेली कचरा कुंडी गणेशोत्सव काळात स्थानिक ग्रामस्थ आणि माजी सदस्य शंकर घोडविंदे यांनी तोडली होती. येथील पाणीपुरी वाल्याला त्रास ठरत असलल्याने ही कचरा कुंडी तोडण्यात आली होती. यासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. यावेळी स्थानिक ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्यांना न जुमानता घोडविंदे यांनी सोबत असलेल्या कामगारांच्या मदतीने कचरा कुंडी तोडली. यानंतर सुभाष नाईक यांनी ग्रामपंचायतीत तक्रार दाखल केली होती. परंतु, त्या तक्रारीला ग्रामपंचायतीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाईक यांनी त्याच जागी कचरा कुंडी बांधावी तसेच विना परवाना कचरा कुंडी तोडणार्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायतीला उपोषणाचा इशारा दिला होता.
नाईक यांच्याकडून उपोषणाचा इशारा देताच या प्रकरणाची नेरळ गावात जोरदार चर्चा सुरू झाली. तसेच, ग्रामपंचायतीने उभारलेली कचरा कुंडी कोणीही व्यक्ती विनापरवाना तोडू शकण्याची प्रथा सुरू झाली तर वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे सरपंच उषा पारधी आणि ग्रामविकास अधिकारी अरुण कारले यांनी दि. 25 सप्टेंबर रोजी खांडा गावातील कचरा कुंडी तोडणारे शंकर घोडविंदे यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये ग्रामपंचायतीने ही कचरा कुंडी तोडण्याची कोणतीही परवानगी न देता तोडली गेली आहे. यामुळे ही तोडण्यात आलेली कचरा कुंडी पूर्वी होती त्याच ठिकाणी स्वतः बांधून द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कचरा कुंडी बांधण्याची कार्यवाही न केल्यास उचित कार्यवाही केली जाईल, असे देखील बजावण्यात आलेले आहे.