चालक जखमी; वायू गळतीच्या धोक्यामुळे सतर्कता
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात उरण ते लोटे नायट्रोजन गॅस वाहतूक करणारा आयशर टेम्पो खचलेल्या रस्त्यावरून चढत असताना गती न घेतल्याने पाठीमागे येऊन खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक गंभीर झाला असून वायू गळतीमुळे वाहतूक पोलीस सतर्कतेने प्रसंग हाताळत असल्याचे दिसून आले.
कशेडी घाटातून चालक अफिझुर रेहमान हा आयशर टेम्पोमध्ये नायट्रोजन गॅस भरून उरण ते लोटे येथे घेऊन जात होता. भोगाव गावच्या हद्दीत खचलेल्या रस्त्यावर चढताना टेम्पोने गती न घेतल्याने टेम्पो मागे येऊन थेट संरक्षक कठडे तोडून सुमारे 70 फूट दरीत कोसळला. या अपघातात चालक अफिझुर रेहमान हा जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण धडे, उपनिरीक्षक समेळ सुर्वे, पोलीस हवालदार चिकणे, रामागडे, माजलकर यांच्यासह पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक फौजदार जयसिंग पवार, पोलीस हवालदार रविंद्र सरणेकर, पोलीस हवालदार घुले, ट्रॅफिक हवालदार धायगुडे, 108 रुग्णवाहिकेची संपूर्ण टीम, महाड नगर परिषद आणि महाड एमआयडीसी येथील अग्निशामक यंत्रणेला कशेडी व पोलादपूर पोलिसांनी पाचारण केले. येथील तीन अग्निशामक बंब घटनास्थळी तातडीने पोहोचले. महामार्ग पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक सतर्कता बाळगत सुरू ठेवली होती.