घरत कुटुंबियांनी मानले तहसीलदारांचे आभार

अपघाती मृत्यूनंतर चार लाखांची मदत

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग-रोहा मार्गावरील मौजे वेलवली-खानाव हद्दीत रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भगदाडामुळे जुलै महिन्यात वेलवली येथील शेतकरी चांगू कमळू घरत यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पीडित कुटुंबाला मदत मिळावी यासाठी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते ॲड. राकेश पाटील, खानाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश गायकर तसेच परिसरातील ग्रामस्थांनी पाठपुरावा केला.

या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. पराते यांनी मयत चांगू घरत यांच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी ॲड. राकेश पाटील यांनी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांच्याकडे महसूल विभागामार्फत तातडीने मदत देण्याची मागणी केली होती.
तहसीलदार विक्रम पाटील यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव शासनाकडे पाठविला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महसूल विभागामार्फत घरत कुटुंबियांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली. याबद्दल घरत कुटुंबियांनी तहसीलदार विक्रम पाटील यांचे आभार मानले.

घटनेच्या दिवशीच तहसीलदार विक्रम पाटील यांच्याकडे मयत चांगू घरत यांच्या कुटुंबाला महसूल विभागामार्फत मदत मिळावी, अशी विनंती केली होती. कागदपत्रांची पूर्तता झाल्यास शासनाकडून निश्चित मदत मिळेल, असे तहसीलदारांनी सांगितले होते. त्यानुसार महसूल विभागामार्फत पीडित कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत मिळाली. मदत करणाऱ्यांचे आभार मानणे हे आम्ही कर्तव्य समजतो. त्याबद्दल तहसीलदार विक्रम पाटील यांचे मनःपूर्वक आभार.

ॲड. राकेश नारायण पाटील
Exit mobile version