पोलीस-अंनिसने केला सत्याचा उलगडा; जादूटोण्याच्या भीतीवर विज्ञानाचा विजय
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अंधश्रद्धा हा आपल्या समाजातील एक फार जुना आणि गंभीर प्रश्न आहे. विज्ञान आणि शिक्षणाच्या युगातदेखील अनेक लोक अजूनही अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेले आहेत. अज्ञान, भीती आणि चुकीच्या समजुती यामुळे अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या पुढे चालत आलेल्या आहेत. यामध्ये काही बाबतीत धार्मिक आडमार्ग, भोंदू बाबा, चमत्कारी उपचार, अंधश्रद्धेमुळे माणूस आपल्या बुद्धीचा वापर न करता केवळ भावनांवर विश्वास ठेवतो. त्याच अनुषंगाने पेण शहराजवळील महाडिकवाडी गावात काही दिवसांपासून भूत, करणी, जादूटोणा होत असल्याची अफवा पसरवून गावात भीतीचे वातावरण निर्माण केले जात होते. यासंदर्भात पोलीस व महा. अंनिसने गावातील लोकांचे प्रबोधन व जनजागृती करून याबाबतची भीती घालवली.
गावात जिवंत कोंबडा जमिनीत पुरणे, स्मशानभूमीत नारळ फोडणे, घरात मोठ्या आवाजात मंत्र-तंत्र करून दहशत पसरवणे अशा घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती. याबाबत ग्रामस्थांनी पेण पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती(म.अंनिस), पेण यांच्याकडे तक्रार केली होती. महा. अंनिसने या प्रकरणाची ग्रामस्थांबरोबर शहानिशा करून उपविभागीय पोलीस अधिकारी नालकुल यांच्याशीही सविस्तर चर्चा केली व ज्यांच्यावर आरोप होते त्या कुटुंबाची भेट घेतली.
सर्व बाबींचा विचार करून गावात भूत, भानामती, करणी, जादूटोणा याबाबत चमत्कार मागील विज्ञान या विषयी प्रात्यक्षिके व प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी सायंकाळी महाडिकवाडी येथे त्यानुसार व्याख्यान घेण्यात आले. या व्याख्यानाचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, अशा प्रकारे करणी-जादूटोणा होत नसल्याची वैज्ञानिक व तर्कशुद्ध माहिती मिळाल्याने ग्रामस्थांच्या मनातील भीती पूर्णपणे दूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस सब इन्स्पेक्टर रसाळ, महा.अंनिसकडून नितीन निकम, प्राचार्य सतीश पोरे, जगदीश डंगर व संदेश गायकवाड उपस्थित होते. यावेळी महा.अंनिसचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
मंत्र तंत्र करून, कोंबडं पुरून वा नारळ फोडून कोणावरही जादूटोणा वा करणी करता येत नाही. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. अशा पद्धतीने कोणी दहशत पसरवीत असल्यास महा. अंनिस सोबत संपर्क साधावा. त्या मांत्रिक, बाबा, भगत वा महाराजाचा योग्य तो कायदेशीर पद्धतीने बंदोबस्त केला जाईल.
-संदेश गायकवाड,
कार्याध्यक्ष, महा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड





