दीपोत्सवाचा लखलखाट

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

सर्वत्र दिव्यांचा झगमगाट, आकाशात उडणारे फटाके, घराघरात लावलेले आकाशकंदिल आणि दारात लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशात सारा परिसर उजळून निघाला आहे. निमित्त आहे दीपोत्सवाच्या लखलखाटाचे.

दीपावलीच्या मंगलमय सणास शुक्रवारी वसूबारसपासून प्रारंभ झाला आहे. शनिवारी धनत्रयोदशीचा सोहळाही उत्साहात साजरा झाला. आता सर्वांनाच वेध लागलेत ते दिवाळीतील पहिल्या अभ्यंगस्नानाचे. नरक चतुर्दशीच्या निमित्ताने पहाटे पहाटे अभ्यंगस्नानाचे. सोमवारी (दि.24) नरक चतुर्दशी असून, त्याच दिवशी सायंकाळी लक्ष्मी पूजन सोहळाही होणार आहे. या दोन्ही सणांची तयारी घरोघरी सुरु झालेली आहे.

दारोदारी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या जात आहेत. तर प्रत्येक घर आकर्षक आकाश कंदिलाच्या प्रकाशाने आणि दारात लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशांनी सारा परिसर उजळून निघाला आहे. कोरोनाची भिती संपली आहे. शिवाय परतीच्या पावसानेही रविवारीच निरोप घेतल्याने उत्सवाचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. रविवारी जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये विविध वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. तयार फराळाबरोबरच मेवा मिठाईकडेही नागरिकांचा कल दिसून आला.

याशिवाय आकर्षक फटाके खरेदीसाठी बच्चेकंपनी पालकांसह स्टॉल्सवर गर्दी करताना दिसून येत होती. रात्री उशिरापर्यंत मार्केटमध्ये खरेदीसाठी तुफान गर्दी झाल्याचे जाणवले. लक्ष्मी पुजनासाठी आवश्यक असलेल्या झेंडूच्या फुलांची आवकही मोठी झाली आहे. ग्राहकांकडून मागणीही वाढली होती. 150 रुपये किलो दराने झेंडूची विक्री होत राहिली.

Exit mobile version