शिवतीर्थावर दिवाळी फराळाचा घमघमाट

जि.प.च्या माध्यमातून महिला बचट गटांना प्रोत्साह

| अलिबाग विशेष | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, दिवाळी निमित्त जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या मुख्य कार्यालयाच्या समोर दिवाळी फराळ महोत्सव 2022चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात बचत गटांनी दिवाळी फराळाचे स्टॉल लावले असून, महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते मंगळवारी (ता.18) करण्यात आले. या फराळाच्या सुवासाचा घमघमाट शिवतीर्थ परिसरात पसरला आहे.

राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष यांच्या माध्यमातून महिला बचत गट स्थापन करण्यात येतात. बचत गटातील महिलांना विविध व्यवसाय करण्यासाठी सक्षम करून त्यांना व्यवसायासाठी सहाय्य करण्यात येते. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी विविध ठिकाणी महोत्सव भरविण्यात येतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त फराळ महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात श्री भवानी महिला स्वयंसहायता समूह, खंडाळा, आरोही महिला स्वयंसहायता समूह झिराड, सप्तशृंगी महिला स्वयंसहायता समूह भाकरवड, आनंदी महिला स्वयंसहायता समूह खानाव, सुसंगती महिला ग्रामसंघ मोठे शहापूर या बचतगटांनी दिवाळी फराळाचे स्टॉल लावले आहेत.

यावेळी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्यासह महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version