सरकार झुकले, मराठा जिंकले

हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करणार

| मुंबई | प्रतिनिधी |

मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळाले असून, मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे सांगितले. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचे उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केले आहे. तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवर जलदगतीने निर्णय घेणार असल्याचेही उपसमितीने मान्य केले आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली गेले पाच दिवस मराठा बांधवांनी मुंबईत जाम केला आहे.

अखेर न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर तसेच आंदोलकांना तात्काळ आझाद मैदान सोडण्याबाबत आदेश दिल्यानंतरही मराठा बांधव मागे हटले नाहीत. अखेर सरकारने नमतेपणा घेत मराठ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. परिणामी, गेले पाच दिवस सुरु असलेल्या या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून मराठ्यांच्या आंदोलनाच्या हत्यारापुढे अखेर सरकारला नमतेपणा घ्यावा लागला.

मराठा उपसमितीसोबत झालेल्या चर्चेत मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे यांनी केली होती. त्यावर ही प्रक्रिया किचकट आहे, त्यासाठी एक-दोन महिन्यांचा वेळ द्यावा, अशी मागणी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पाच मागण्या केल्या होत्या. त्यावर मराठा उपसमितीकडून आठ प्रस्ताव जरांगे यांना देण्यात आले. हैदराबादच्या गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच उपसमितीने मसुद्यात ज्या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत, त्यावर तातडीने जीआर काढण्यात येणार असल्याचा शब्द दिला आहे. मराठा उपसमितीने मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि मसुद्यामध्ये काय तरतूद केली आहे याची माहिती दिली. मराठा उपसमितीमध्ये अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता.

या मागण्या मान्य

हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार.

गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना चौकशी करुन कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

सातारा गॅझेटवर अभ्यास करून त्याला जलद मान्यता देण्यात येईल. त्यामध्ये काही त्रुटी आहेत, एका महिन्यात त्याला मान्यता देण्यात येणार आहे.

मराठा आदोलकांवरील या आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार.

शैक्षणिक पात्रतेनूसार शासकिय नोकरी देणार.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या वारसांसाठी 15 कोटींची मदत देणार. आठवड्याभरात त्यांच्या खात्यात मदत जमा होईल.
मराठा आणि कुणबी एकच मागणीवर वेळ मागितला
मनोज जरांगे यांनी या मागण्या मान्य केल्या तर त्यासंबंधी तातडीने जीआर काढतो आणि त्याची अंमलबजावणी करतो असा शब्द मराठा उपसमितीने दिला. पण मराठा आणि कुणबी एकच आहेत, या मनोज जरांगे यांच्या मागणीवर तूर्तास निर्णय घेण्यात आला नाही. ही प्रक्रिया किचकट असल्याने त्याला एक-दोन महिन्यांचा वेळ द्या, अशी मागणी उपसमितीने केली आहे.

एकदा तुम्ही अंमलबजावणी आणि जीआर दिला तर 9 वाजता मुंबई खाली होईल. नाचत नाचत पोरं गावाकडे जातील. तुम्ही थांबा म्हटलं तरी थांबणार नाही. तुम्ही जीआर द्या. आम्ही तुमच्या स्वागताला तयार राहू. ङ्गजिंकलो रे राजे होफ आपण, तुमच्या ताकदीवर. आज कळालं गरिबांची ताकद किती मोठी आहे.

मनोज जरांगे पाटील,
मराठा आंदोलक

Exit mobile version