हवेली येथील शासकीय वसतिगृहाचा होणार कायापालट

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा आधार; दुरुस्तीच्या कामासाठी निधी मंजूर

| तळा | प्रतिनिधी |

तळा तालुक्यातील बोरघर हवेली येथे असलेल्या शासकीय वसतीगृहाचा कायापालट होणार असून, या वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या कामासाठी शासनाकडून 2 कोटी 99 लाख 21 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 2007 साली मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या या वसतिगृहाची दुरवस्था झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, त्याला मंजुरी मिळाली असून आचारसंहिता संपल्यानंतर जानेवारीच्या अखेरीस निधी उपलब्ध झाल्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने वसतिगृहाच्या आतील गिलावा, बाहेरील गिलावा, मलनिस्सारण व्यवस्था, लादी बदलणे, दारे व खिडक्या बदलणे, रंगकाम करणे, वसतिगृहावर शेड तयार करणे, संकीर्ण बाबी आदी गोष्टींचा समावेश आहे.

शालेय, महाविद्यालयीन, अभियांत्रिकी ई. शिक्षण घेण्यासाठी तालुक्यात आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तळा तालुक्यातील शासकीय वसतिगृह हा एक मोठा आधार बनला आहे. तळा तालुक्यात शिक्षणासाठी आलेल्या इतर तालुक्यातील व जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भाड्याने रूम घेणे, खाणावळ, शैक्षणिक साहित्य यांसह ईतर खर्च परवडत नसल्याने अशा विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा आधार मिळतो. तसेच वसतिगृहात राहणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून दरमहा भत्ता, प्रकल्प मदत, सहलीसाठी मदत मिळत असल्याने आर्थिक सहकार्यही लाभते.

तळा तालुक्यात 2007 साली उभारण्यात आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची दुरवस्था झाल्याने त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली असून आचारसंहिता संपली की या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

-गजानन बिहाडे
गृहपाल शासकीय वसतिगृह तळा

Exit mobile version