पूरग्रस्त गावांचा तज्ज्ञांमार्फत अहवाल करुन सरकारचे लक्ष वेधणार

मेधा पाटकर यांची ग्वाही
| पोलादपूर | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि महाड तालुक्यातील ज्या गावांना अतिवृष्टीमुळे दरडग्रस्त व पूरग्रस्त होऊन आर्थिक नुकसान, पशुधन व जीवितहानी सोसावी लागली. या सर्व बाबतीत तज्ज्ञांमार्फत अहवाल करुन राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधणार असल्याची ग्वाही जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय अध्यक्षा मेधा पाटकर यांनी दिली.

महाड तालुक्यातील तळिये गावात 22 जुलै रोजी झालेल्या भुस्खलनात दरडीखाली गाडलेल्या घरांची पाहणी करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय अध्यक्षा मेधा पाटकर यांनी भेट दिली. याप्रसंगी युसूफ मेहेरअली सेंटरच्या विजया चौहान व नितीन अणेराव, गुड्डी, मुंबईच्या सुनिती सुरव, राष्ट्रसेवा दल मुंबई सीरत सातपुते तसेच कार्यकर्ते विलास पिरोटे, इब्राहिम खान, मनीष देशपांडे, अस्लम बागवान, प्रशांत गावंड, अजय भोसले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रायगड अध्यक्ष शैलेश पालकर, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन दारूबंदी कार्यकर्ते अब्दुल हक खलफे आदींनी एकाचवेळी बाधित कुटुंबातील लोकांना कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबत आढावा घेतला.

रायगड जिल्ह्यातील तळिये दरडग्रस्त गावाच्या पाहणीनंतर मेधाताईंनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तातडीने शक्य झाल्यास केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक सविस्तर पत्र लिहिणार असल्याचे यावेळी मेधा पाटकर यांनी सांगितले. महाड शहरातील पुरसमस्या आणि यादरम्यान रासायनिक प्रदूषण करण्यासाठी सज्ज असलेले कारखाने यासंदर्भात नाथाभाई व्यायामशाळेच्या इमारतीमध्ये प्राचार्य डॉ. समीर बुटाला, मिलिंद टिपणीस, डॉ. राहुल वारंगे, पक्षीमित्र सागर मेस्त्री तसेच अन्य अभ्यासू व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी मेधाताई पाटकर यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेत महाडच्या पूरप्रश्‍नी शासनाचे लक्ष वेधण्याचा नजिकच्या काळात बैठक घेऊन प्रयत्न करू असे सांगितले.

Exit mobile version