म्हसळा | वार्ताहर |
राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे प्रश्न त्वरित निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश हा शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा हाच आहे. त्या अनुषंगाने तालुक्यात सुद्धा हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवणार असल्याचे तहसीलदार समीर घारे यांनी सांगितले. यामध्ये विशेषत: नवीन शिधापत्रिका अर्ज स्वीकृती, शिधावाटप पुस्तकावरील नाव कमी करणे व नावे वाढविणे, खराब झालेली शिधापत्रिका बदलणे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग, राष्ट्रीय निवृत्ती सेवा योजना, नवीन मतदार नोंदणी,उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र,जन्म मृत्यू नोंदणी व विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड नोंदणी करणे इत्यादी योजनांचा समावेश आहे.या योजनांचा लाभ आता आपल्याच गावात मिळणार आहे.यासाठी कार्यालयात येण्याची गरज लागणार नाही. तरी या अभियानात सहभागी होऊन नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन घारे यांनी केले आहे.