ग्रा.पं.कर्मचार्‍याने मिळविली वकिलाची सनद

नोकरी करून घेतली पदवी
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी जगदीश डबरे यांनी नुकतीच वकिलीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. त्याबद्दल सर्वस्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 1999 मध्ये बारावी पास या शैक्षणिक पात्रतेवर नोकरीवर लागलेल्या जगदीश डबरे यांना कुटुंबात कोणीही पदवीधर नाही याची खंत कायम होती. त्यामुळे त्यांनी नोकरीमध्ये स्थिर झाल्यानंतर पदवी मिळविण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. 2015 मध्ये ग्रामपंचायत कर्मचारी असलेले जगदीश डाबरे हे पदवीधर बनले. त्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा फायदा नेरळ ग्रामपंचायतीला देखील झाला. त्यावर देखील ते समाधानी नव्हते. त्यांनी वकील व्हायला हवे, अशी जिद्द मनाशी बाळगली आणि वकिलीचे शिक्षण देणार्‍या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली सीईटी परिक्षा 2016 मध्ये दिली. 2017 मध्ये पनवेल येथील वकिली शिक्षण देणार्‍या महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पहिल्याच प्रयत्नात जगदिश डबरे हे वकिलीची परीक्षा पास झाले आहेत.

ज्या दिवशी सुट्टी असेल, त्यावेळी जगदीश हे पनवेल येथील महाविद्यालय गाठायचे आणि अभ्यास करायचे तर शनिवार आणि रविवारी देखील त्यांचा मुक्काम हा महाविद्यालयात असायचा. मात्र सुट्टीच्या दिवशी अभ्यास करून वकील होणार नाही, याची कल्पना आल्याने जगदीश यांनी ऑनलाईन शिक्षण घेण्याचे नक्की केले. ऑनलाईन शिक्षणातून जगदीश यांना वकिलीची परीक्षा पास होण्यास मोठी मदत मिळाली. आता भविष्यात नेरळ ग्रामपंचायतमधील कोणतेही वादविवाद हे कायदेशीर बाबींवर पोहचले तर ज्ञानाचा फायदा त्या ठिकाणी आपण करू, असे त्यांनी जाहीर केले आहे.

Exit mobile version