| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
कोणतीही स्पर्धा असो, भारत-पाक सामना एकीकडे आणि इतर सामने दुसरीकडे असे वास्तव नेहमीच पाहायला मिळते. ही एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा भारतात होत असताना या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित भारत-पाक सामन्याच्या उत्सुकतेने शिखर गाठले आहे. त्यामुळे अहमदाबादचे क्रिकेट रणही आता तापू लागले आहे. शनिवारी होणाऱ्या भारत-पाक सामन्याची प्रतीक्षा क्रिकेट विश्वाला लागून राहिली आहे. पाकचा संघ गुरुवारी येथे दाखल झाला; तर अफगाणिस्तानविरुद्धची मोहीम फत्ते करून भारतीय संघाने गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये आला. त्यामुळे या क्रिकेट युद्धासाठी आता नरेंद्र मोदी स्टेडियमचे रणांगण तयार झाले आहे.
भारत- पाकिस्तान यांच्यामधील लढत पाहण्यासाठी दिग्गजांचीही उपस्थिती असणार आहे. बीसीसीआयकडून विशेष पाहुण्यांना गोल्डन तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत व सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे.
गिलचा तासभर सराव
भारताचा सलामीवीर शुभमन गिल डेंग्यूतून सावरला असून त्याने गुरुवारी तासभर नेट्समध्ये सराव केला. त्यामुळे एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत तो खेळण्याची शक्यता बळावली आहे. गिल विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. मात्र पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या बहुचर्चित सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुरक्षारक्षकांकडून ताबा
पाक संघानंतर आता भारतीय संघही दाखल झाल्यामुळे सुरक्षारक्षकांनी स्टेडियमचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. सामन्याच्या वेळी कशी सुरक्षा व्यवस्था करायची, याची रंगीत तालिम होत आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्याला लाखभरापेक्षा अधिक गर्दी झाली होती. तो अनुभव असला, तरी भारत-पाक सामन्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्यामुळे काटेकोर सुरक्षा व्यवस्था असणार आहे.
आकडेवारी काय सांगते?
आतापर्यंत 29 एकदिवसीय सामने खेळलेत
प्रथम फलंदाजी करणारा संघ 17 वेळा जिंकला
दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 13 वेळा जिंकला
खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 237 धावा







