क्रिकेटच्या अंतिम महासंग्रामाचे जल्लोषात उद्घाटन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमधील कुरुळ येथील आझाद मैदानात पीएनपी चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्याच्या महासंग्रामाचे उद्घाटन बुधवार (दि. 21) फेब्रुवारी रोजी करण्यात आले. शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे यांच्या हस्ते नारळ वाढवून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.



यावेळी अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, यू. व्ही. स्पोर्टस अकादमीच्या संचालिका चित्रलेखा पाटील, ॲड. विजय पेढवी, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे, आदी मान्यवर, संघ मालक व खेळाडू उपस्थित होते.


प्रदीप स्पोर्टस साखर आणि मुस्कान 11 मांडला या संघामध्ये पहिल्या उपांत्य फेरीचा सामना खेळविण्यात आला. मांडला संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. साखर संघाने सहा षटकात 115 धावा केल्या. प्रत्युत्तर देताना मुस्कान 11 मांडला संघासमोर विजयासाठी सहा षटकात 116 धावांची आवश्यकता होती. मात्र, आठ खेळाडू बाद करीत 88 धावांमध्ये या मांडला संघाला गुंडाळून साखर संघाने 28 धावांनी विजय मिळविला. यामध्ये आक्षीच्या सरंपच रेश्मा पाटील यांच्या हस्ते अनंत पाटील या खेळाडूला सामनावीरचा किताब देण्यात आला.

Exit mobile version