प्रत्येकी दोन गुणांची कमाई; अजिंक्यपद लढतीची चुरस कायम
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गतविजेता डिंग लिरेन व भारताचा युवा स्टार डी. गुकेश यांच्यामधील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीतील चौथ्या फेरीचा सामना बरोबरीत राहिला होता. त्यामुळे शुक्रवारपर्यंत दोन्ही खेळाडूंमध्ये प्रत्येकी दोन गुणांसह बरोबरी झाली होती. चौथा सामना काळ्या मोहर्यांनी खेळताना डी. गुकेशने आरामात बरोबरी करून जगज्जेतेपदाच्या डिंग लिरेनविरुद्ध लढतीची चुरस कायम ठेवली आहे.
गुकेशच्या आवडत्या टेनिस खेळात ज्याप्रमाणे सर्व्हिसचे महत्त्व असते त्याप्रमाणे बुद्धिबळात पांढर्या सोंगट्या घेऊन खेळण्याचे महत्त्व असते, कारण पहिली चाल करण्याचा अधिकार पांढर्या मोहर्यांचा असतो. विश्वविजेत्या डिंगने चौथ्या फेरीत पांढर्या मोहर्यांनी खेळताना अतिशय संथ सुरुवात केली. उंटाची एक वेगळी चाल रचून गुकेशला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न डिंगने केला. गुकेशने अतिशय थंडपणे विचार करून सर्व मोहरी योग्य त्या जागी आणल्या. डिंगने घोड्याची सुंदर चाल रचून घोडा पटाच्या मध्यभागी आणून ठेवला. पटाच्या मध्यभागी असलेले घोडे प्रतिस्पर्ध्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतात. गुकेशने हे ओळखून स्वतःचा घोडाही पटाच्या मध्यभागी नेऊन ठेवला. या परिस्थितीत डिंगला प्याद्याची एक आक्रमक चाल करण्याची संधी होती; परंतु त्याने डाव गुंतागुंतीचा करणे टाळले आणि घोड्यांची अदलाबदली केली.
हळूहळू उंट, हत्ती अशा एकापाठोपाठ एक मोहर्यांच्या अदलाबदली होऊन दोघांकडे फक्त वजीर, हत्ती आणि प्यादी राहिली. चाळीस खेळ्या झाल्यावर या परिस्थितीत दोन्ही खेळाडूंनी डाव बरोबरीत सोडवायचे मान्य केले. या विश्वविजेतेपदाच्या सामन्यामध्ये चाळीस खेळ्या झाल्याशिवाय खेळाडूंना डाव बरोबरीत सोडविता येत नाही, असा नियम आहे. लोकांना आकर्षक लढती बघायला मिळाव्यात, असा त्यामागचा उद्देश आहे. या फेरीतील लढत थोडीशी नीरस वाटली तरी गुकेशच्या दृष्टिने काळ्या मोहर्यांनी सहज बरोबरी साधणे महत्त्वाचे होते.
पाचव्या फेरीत गुकेशला पांढरी मोहरी घेऊन खेळण्याची संधी मिळेल. त्याचा फायदा तो उठवू शकतो का, याकडे सर्व भारतीय बुद्धिबळप्रेमींचे लक्ष लागले आहे. पहिल्या सामन्यात जरी पांढरी मोहरी घेऊन गुकेश हरला होता तरी त्याचा संबंध पहिल्यावहिल्या जागतिक सामन्याच्या दडपणाशीच जास्त होता. आता या लढतीला सरावलेला गुकेश पाचव्या सामन्यात विजय नोंदवू शकतो का, ते पाहणे महत्चाचे ठरणार आहे. सध्या तरी दोन गुणांवर हा सामना बरोबरीत चालला आहे.
पराभवानंतर विश्रांती करण्यासाठी वेळ मिळाला. त्यामुळे माझ्यासाठी ही चांगली बाब घडली. तरीही मी या फेरीमध्ये सावध पद्धतीने खेळलो.
– डिंग लिरेन, विश्वविजेता
मी चांगल्या चाली रचण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या क्षणी चांगल्या पोझिशनमध्ये होतो. काळ्या मोहर्यांसह खेळताना जेवढे चांगले खेळायला हवे तेवढे खेळण्याचा प्रयत्न करीत होतो. अखेर लढत ड्रॉ राहिली.
– डी. गुकेश, भारतीय ग्रँडमास्टर