शासनाचा खर्च वाया
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी येथील समाज मंदिर हे दयनीय अवस्थेत आहे. त्या समाज मंदिराच्या छतावर गवत उगवले असून, आतमधील परिसर कोंडवाड्यासारखा बनला आहे. ग्रामपंचायत प्रशासन आणि आदिवासी विकास विभाग अशा सामाजिक सभागृह म्हणून वापरण्यासाठी बांधलेल्या वास्तूकडे दुर्लक्ष करीत असल्याने आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी ही आदिवासी वस्ती या ग्रामपंचायतीमधील सर्वात मोठी आदिवासीवाडी समजली जाते. या आदिवासीवाडीमध्ये 100 हून अधिक घरांच्या लोकवस्तीमधील आदिवासी लोकांसाठी शासनाने सामाजिक सभागृहाची निर्मिती केली आहे. तेथे शासनाच्या निधीमधून समाज मंदिर उभे राहिले आहे. मात्र, त्या समाज मंदिराची स्थिती अतिशय दयनीय आहे. ताडवाडी ग्रामस्थांसाठी बांधलेल्या समाज मंदिरचे छपरावर गवत उगवले आहे. तर भिंती या चांगल्या स्थितीत असून, खिडक्यांची तावदाने तुटून पडली आहेत. समाज मंदिराच्या आतमध्ये कोणी आदिवासी ग्रामस्थाने प्रवेश केला नसेल, अशी स्थिती आहे. त्या समाज मंदिरात दिवसादेखील काळोख असून, आतमध्ये कोंडवाड्यासारखी स्थिती आहे.
वाडीमध्ये असलेले समाज मंदिर हे नादुरुस्त झाले असून, समाज मंदिराअभावी स्थानिक आदिवासी लोकांना आपले सार्वजनिक साहित्य ठेवण्यास जागा उपलब्ध नाही. त्याचवेळी स्थानिक आदिवासी कार्यक्रम साजरे करण्यासाठी आता जागा उपलब्ध नाही. त्यामुळे मोठ्या लोकवस्तीच्या वाडीमध्ये स्थानिक आदिवासी लोकांना आपले सण सामूहिकपणे साजरे करता येत नाहीत. त्याचवेळी समाज मंदिराच्या देखभालीकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शासनचा निधीदेखील वाया गेला असून, स्थानिकांची गैरसोय समाज मंदिर उपल्बध नसल्याने झाली आहे.