आज महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती भयंकर भयावह आहे. लोकशाहीच्या खून घडणाऱ्या घटना राज्यात वारंवार घडत आहेत. कधी नव्हे त्या राजकीय घटना राजकारणाला काळिमा फासत आहेत. राज्यातील जनता हतबल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जनतेचे मूलभूत जे प्रश्न- महागाई, बेरोजगारी इत्यादी प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ नाही. सर्व पक्ष शिवाजी महाराजांचा उदोउदो करताना दिसतात. मात्र, निष्ठा काय असते याचा विसर पडलेला दिसत आहे. निष्ठावान आमदार आज नगण्य दिसत आहेत. मात्र, भाई जयंत पाटील त्याला अपवाद आहेत. मोहाचे अनेक प्रसंग निर्माण झाले, पण भाईंनी पक्षनिष्ठा सोडली नाही. शेकापक्षाशी ते ठाम राहिले आहेत. निश्चयाचा महामेरू बनून सर्व प्रलोभने लाथाडली.
अशा राजकीय परिस्थितीत शेकापक्षाला पुढे नेण्याचे कसब, क्षमता फक्त नि फक्त जयंत भाईंमध्येच आहे. आगामी काळ शेकापक्षासाठी निश्चित चांगला असून, सरचिटणीस पदाची धुरा भाई जयंत पाटील लिलया सांभाळतील यात तिळमात्र शंका नाही. लोकशाही टिकविण्यासाठी आज समाजाला अशा तडफदार निष्ठावान आमदाराची नितांत गरज आहे. राज्यात विरोधी पक्ष कसे शांत होतील याकरिता सर्व प्रकारचे मार्ग निवडून त्यांचे तोंड कसे बंद होईल यासाठी सारी धडपड चालू आहे. विरोधी पक्ष बळकट असेल तरच विकासकार्याला गती मिळते, हेही तेवढेच खरे आहे. नाही तर जनतेची लूट. भाईंनी कर्तृत्व, प्रामाणिकपणा, मेहनत यांच्या जोरावर राज्यातील राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनता त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहात आहे. भाईच जनता जनार्दनाचे तारणहार होऊ शकतात.
आमदार जयंत पाटील यांनी सहकार, उद्योग, बँकिंग या सर्वच क्षेत्रात आपला यशस्वी ठसा उमटविला आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी ते धडपडत आहे. सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांची वाटचालही निश्चित गगनाला गवसणी घालणारी अशीच आहे. अनेक आंदोलने आणि सामाजिक चळवळीतून कल्पकता आणि नेतृत्वाचा ठसा ते जनमानसांवर उमटवित आहेत. दीनदुबळ्यांचे प्रश्न ते पोटतिडीकीने सोडवित आहेत. त्यामुळे निष्ठावान तरूण कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भाईसुद्धा कार्यकर्त्यांकडून केवळ अपेक्षा ठेवत नाहीत, तर त्यांच्याही अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवायला नेहमीच प्रथम स्थान देतात. प्रसंगात त्यांच्या घरापर्यंत स्वतः धावून जातात. त्यांना यथाशक्ती सढळ हस्ते मदत करतात. त्यांना आधार देतात. हे काम भाई जयंत पाटील यांच्याशिवाय करणारे आमदार फारच विरळ सापडतील आणि म्हणूनच जनतेसोबत त्यांची नाळ जोडली गेली आहे. भाईंच्या एका हाकेबरोबर कार्यकर्त्यांची अलोट गर्दी उसळते.
आज सारे भांडवलदारांचे काम करताना दिसतात. त्यांचेच चोचले पुरवितात. मात्र, आमदार जयंत पाटील हेच उपेक्षितांचे खरे आशेचे किरण आहेत. सर्वसामान्यांचे दैनंदिन प्रश्न असोत किंवा सामाजिक, विधानपरिषदेमध्ये अभ्यासू वृत्तीने, जिद्दीने बुलंद आवाजात मांडताना भाई आपणास नेहमीच दिसतात. बरेच वेळा संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भंबेरी उडवतात. अशावेळी त्यांची भाषा आक्रमक असते. त्यामागे त्यांची तळमळ असते, भावना असते आणि म्हणूनच ते पोटतिडीकीने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात नि प्रश्न सोडवितात, म्हणून जनतेचे प्रेम त्यांना मिळत आहे. त्यामुळेच भाईंचा लोकसंग्रहसुद्धा प्रचंड आहे. सर्वांना भाई जवळचे वाटतात.
कोकणात आणि महाराष्ट्रात सहकार चळवळ आमदार भाई जयंत पाटील यांच्यामुळेच वाढीस लागली आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची यशोगाथा संपूर्ण देशात पोहोचविण्याचे श्रेय भाईंनाच जाते. बँकेकडे आदर्श मॉडेल म्हणून पाहिले जात आहे. परदेशी संस्था अभ्यास करण्यासाठी बँकेला भेट देताना पहावयास मिळतात. उद्योग आणि इतर क्षेत्रातही भाईंनी आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला आहे. प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून रायगडमध्ये शैक्षणिक जाळे निर्माण करुन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षण त्यांचे दारी नेऊन ठेवले आहे. आपल्या उत्पन्नातील 25 टक्के हिस्सा शिक्षणासाठी खर्च करणारे ते एकमेव आमदार आहेत, यात अतिशयोक्ती मुळीच नाही.
संपत्ती, पद, नेतृत्व सर्व काही असतानाही भाईंची राहणी अतिशय साधी, नम्र वागणं-बोलणं, निगर्वीपणामुळे सर्वांसोबत विरोधकही आश्चर्यचकित होत आहेत. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून, राजकारणापलीकडे जाऊन ते टिकविताना दिसतात. विरोधकही त्यांच्यावर अलोट प्रेम करतात. त्यांच्या अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावतात. म्हणून ‘किमयागार आमदार’ हे आभूषण उगाच दिले जात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर लाल बावट्याचं प्राबल्य टिकविण्याचे सामर्थ्य फक्त आमदार जयंतभाई पाटील यांच्याकडेच आहे. आजच्या वाढदिवसानिमित्त भाई तुम्हाला सर्व जनतेमार्फत हार्दिक शुभेच्छा.
खंबीर नेता जनतेचा
बुलंद आवाज कष्टकऱ्यांचा
म्हणूनच…
आम्हाला सदैव अभिमान
भाई जयंत पाटीलांचा॥
– राजाराम भगत