पेणमधून दीड हजार गणेशमुर्तीला मागणी
| अलिबाग | प्रतिनिधि |
माघी गणेशोत्सव म्हणजे श्री गणेश जयंती सोहळा रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि.13) रोजी ठिकठिकाणी साजरा होणार आहे. या निमित्ताने रायगड पोलीस दलाच्या हद्दीत 415 मुर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यात सार्वजनिक 125 व खासगी 290 मुर्तींचा समावेश आहे. गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे या उत्सवाला वाढता क्रेझ दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील कुलाबा किल्ल्यात, मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सिध्दीविनायक, खालापूरमधील महड येथील वरदविनायक आणि पाली येथील बल्लाळेश्वर हे खूप जूने मंदिर असून अनेक गावागावात गणेश मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये पुर्वी माघी गणेशोत्सव साजरा केला जात होता. मंदिरात जाऊन दर्शन घेतले जात होते. परंतु या उत्सवाचा आता क्रेझ वाढल्याने अनेकजण पेण येथून गणेशमुर्ती विकत आणून मुर्तीची प्रतिष्ठापना करीत आहेत. गेल्या पाच वर्षात हा क्रेझ वाढला आहे.
जिल्ह्यात पारंपारिक मंदिरासह वेगवेगळ्या ठिकाणी मंडळामार्फत गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना करून दोन ते तीन दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केली जात आहे.
यंदा माघी गणेशोत्सवानिमित्त पेण येथील दीड हजार मुर्तींना मागणी आली असून अलिबागसह, पनवेल, मुंबई, नवी मुंबईत मागणी अधिक असल्याची माहिती मुर्ती विक्रेते दिपक समेळ यांनी दिली.
पनवेल व उरण तालुका वगळता रायगड पोलीस दलाच्या हद्दीतील 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीत 415 गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. सकाळी ढोल ताशांच्या गजरात मुर्तींचे स्वागत करून प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभर भजनांसह वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. मंगलमय व आनंदमय वातावरणात हा उत्सव साजरा करता यावा यासाठी रायगड पोलीस दलामार्फत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.
