‘पैशाने तुटली नाती’ नाटकाचा वाढता गोडवा

| चिरनेर | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील करंजाडे आर.थ्री. येथे शिवजयंतीच्या निमित्ताने सोमवारी (दि.19) रात्री अष्टगंध कला मंचाच्या वतीने ‘पैशाने तुटली नाती’ हा नाट्य प्रयोग सादर करण्यात आला. या नाट्य प्रयोगाला पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

या नाटकात नाटककार हासुराम पाटील यांच्या नाट्य लेखणीतून त्यांच्या प्रज्ञेचे प्रतिबिंब ठाई ठाई अनुभवायला मिळते. तर दिग्दर्शक धनेश्वर म्हात्रे यांनी हे नाटक बंदिस्तपणे दिग्दर्शित केले असून, एक देखणा प्रयोग असे त्याचे वर्णन करता येईल. आठ महिन्यात या नाटकाचे चार प्रयोग झाले असून, या प्रयोगाला अजून वाढती मागणी आहे. त्यामुळे पैशाने तुटली नाती या नाट्य कलाकृतीचा, प्रेक्षकांच्या नात्यातील गोडवा मात्र अधिकच वाढत चालला आहे. त्याच अनुषंगाने अष्टगंधाच्या कलाकारांनी नाटकात आपल्या अभिनयाचे रंग भरत, नाट्य रसिकांना एक वेगळा आनंद दिला. त्यामुळे नाट्य रसिकांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आले.

नाटकात हासुराम पाटील, सुमित कुंभार, वैशाली मोहिते, अशोक म्हात्रे, कृष्णकांत म्हात्रे, रुचिता म्हात्रे, चेतन पाटील, परीशा सरोदे, दिगंबर कोळी, प्रसाद कडू, रोशन घरत, जयकिसन मोकल, प्रज्योत पाटील आदी कलाकारांनी नाटकातील प्रसंग आणि सादरीकरणातून नाटकाची उंची वाढविली आहे. आनंद कुबल, अशोक पालेकर, कमलाकर सुतार, ध्रुवराज म्हात्रे, अमृत म्हात्रे या तंत्रज्ञांनी संगीत, रंगभूषा, ध्वनी आणि नेपथ्यातून प्रत्येक प्रसंग फुलविला आहे.

नाटकाची पार्श्वभूमी ग्रामीण असून, नाटकात लेखकाने* *सध्याच्या परिस्थितीचे वास्तव उभे केले आहे. हे नाटक एका नाते संबंधावर आधारलेले आहे. या नाटकाचे शंभर प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे.

अशोक म्हात्रे, अध्यक्ष अष्टगंध कला मंच

ग्रामीण नाट्य संस्कृती पूर्वीप्रमाणेच अभंग राहावी. यासाठी ही नाट्य चळवळ उभारली आहे.

हासुराम पाटील, लेखक
Exit mobile version