। नेरळ । प्रतिनिधी ।
हिंदुस्थान पेट्रोलियमची पाईपलाईन टाकण्यात आली असून त्या पाईपलाईनची चौकीदारी करण्यासाठी 26 चौकीदार काम करत आहे. त्या चौकीदारांना हिंदुस्थान पेट्रोलियमकडून कामावरून कमी करण्यात आले आहे. त्या सर्व चौकीदारांनी सुनील गोगटे यांच्याकडे न्यायाची मागणी केली असून गोगटे यांनी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या व्यवस्थापनाकडे दाद मागितली आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस पाईपलाईनची सुरक्षा सांभाळण्यासाठी चौकीदार म्हणून कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली होती. गेल्या तीन वर्षापासून काम करीत असलेल्या कामगारांना कंपनी प्रशासनाने अचानके कमी करण्याचा घाट घातला आहे. हे सर्व 26 कामगार सिक्युरिटी गार्ड किंवा तत्सम ड्युटी करणारे कामगार हिंदुस्तान पेट्रोलियम पाईपलाईनच्या चौक्या आहेत आणि पाईपलाईन यांची देखरेख ठेवण्याचे काम 24 तास करत होते. मात्र बाधित शेतकरी असलेल्या या चौकीदार कामगारांची कंपनीने फसवणूक केली आहे. त्यांना कामावरून काढून टाकल्याने त्यांच्या कुटुंबाच्या रोजीरोटीवर गदा आली आहे. त्यामुळे ते भयभीत होऊन सुनील गोगटे यांना भेटले.