रायगडात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

आता नजर मतदानाकडे,मतमोजणी 19 जानेवारीला
। अलिबाग । प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात होणार्‍या नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचाराचा तोफा रविवारी थंडावल्या.आता सार्‍यांच्या नजरा 21 डिसेंबरला होणार्‍या मतदानाकडे लागल्या आहेत.यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.एक दिवसाचा राजा असलेला मतदार आता कुणाच्या पारड्यात आपले बहुमोल मत टाकतो याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे.दरम्यान,मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.निवडणूक मतमोजणी आता 19 जानेवारीला होणार आहे.
खालापूर, पोलादपूर, तळा, म्हसळा, माणगाव आणि पाली या सहा नगरपंचायतीमध्ये ओबीसी जागा वगळून 80 जागांसाठी 290 दाखल निवडणूक नामनिर्देशन अर्जांपैकी 53 जणांनी माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात 237 उमेदवार उरले आहेत. प्रत्येक नगरपंचायतीमध्ये राजकीय युत्या आणि आघाड्यांना जोर चढला असून बहुरंगी लढती होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील पाली, तळा, म्हसळा, पोलादपूर, माणगाव आणि खालापूर या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. कार्यक्रम सध्या सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाच्या स्थगित निर्णयामुळे सहा नगरपंचायतीं मधील एकूण 80 जागांसाठी निवडणूक होत आहे. या सहा नगरपंचायतींमध्ये 237 उमेदवार रिंगणात उरले असून त्यांच्यात लढत होणार आहे. यामध्ये पालीमध्ये 46, तळा 36, म्हसळा 38, पोलादपूर 39, माणगाव 30 आणि खालापूरमध्ये 48 यांच्यात लढत होणार आहे.या सहा नगरपंचायत निवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे.

प्रचारात आरोप, प्रत्यारोप
गेले आठवडाभर या नगरपंचायतींच्या प्रचाराच्या निमित्ताने रायगडातील शेकाप,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,भाजप,मनसे,काँग्रेस आदी राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार करुन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे मतदार कुणाच्या बाजुने कौल देतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

24 प्रभागात 18 जानेवारीला मतदान
रायगडातील सहा नगरपंचायतींमधील 24 प्रभाग हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात ठेवण्यात आले होते.पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रभागातील निवडणूक आता खुल्या प्रवर्गातून होणार आहे.त्यासाठी 18 जानेवारीला मतदान होणार असून या सर्वांची एकत्रित मतमोजणी आता 19 जानेवारीला केली जाणार आहे.

Exit mobile version