सुश्राव्य गायनांनी रंगला गुरुपौर्णिमेचा सोहळा

। नेरळ । प्रतिनिधी ।
भजनभूषण गजाननबुवा पाटील यांची 51 वी गुरुपौर्णिमा शेकडो शिष्यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत साजरी झाली. स्व. गजाननबुवा पाटील स्मारक समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी गजाननबुवा यांना साथ देणारी मंडळे आणि भजनी गायक यांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आले.

गुरुपौर्णिमा कर्जत येथील कपालेश्‍वर मंदिरात आयोजित केली होती. त्यावेळी गुरुपौर्णिमेची सुरुवात पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य नानाबुवा कारेकर यांच्या रामकृष्ण हरी आणि रूपाच्या अभंगाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन कर्जतचे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, मनोहर थोरवे तसेच स्मारक समितीचे अध्यक्ष दिपकबुवा करोडे आदींच्या हस्ते झाले.

त्यानंतर गजानन बुवा पाटील यांना त्यांच्या हयातीत साथ देणारे भजन मंडळांचा सन्मान स्मारक समितीच्या वतीने करण्यात आला. त्यात सत्कार हनुमान क्रीडा मंडळ- कुर्ला, मुंबई, छत्रपती शिवाजी मंडळ- कर्जत, दत्त प्रासादिक भजन मंडळ-आदई, दुर्गादेवी भजन मंडळ-नेरळ, कपालेश्‍वर देवस्थान समिती-कर्जत, गजानन प्रासादिक भजन मंडळ- वरसोली यांच्यासह भिडे सर- किहीम, आरेकर बंधू- कर्जत, मने बंधू- पनवेल, निघोजकर बंधू- कर्जत, कै. शांताराम शेलार- कर्जत, कै. सुभाष हनुमंते- कर्जत, कै.रमेशशेठ चंदन- कर्जत, बल्लाळ जोशी- नेरळ,विठ्ठल कडू- कर्जत,दिगंबर कांबळे- कर्जत, तुकाराम निगुडकर- पळसदरी, भालचंद्र विशे- बदलापूर, कै. हरिश्‍चंद्र दिघे-दहिवली,कै. मधूकर आंबवणे- कर्जत, रंभाजी थोरवे- पोसरी यांचा सन्मान करण्यात आला.

गुरुपौर्णिमा सोहळ्यात कार्यक्रमाची सुरुवात नानाबुवा कारेकर यांनी रामकृष्ण हरी आणि रूपाचे अभंगाने झाल्यानंतर उपस्थित शिष्यांनी परिमलाची धाव, गुरुचरणी ठेविता भाव, माझ्या वडिलांची मिराशी, शालू रंगाने भरला, सांगड बांधा रे भक्तीची, आम्ही चकोर हरीचे, गुरुमाता गुरुपिता, भजन करी महादेव आदी भजन अभंग, गवळण सादर करीत सायंकाळी सुरू झालेली गुरुपौर्णिमा रात्री अकरा पर्यंत रंगत गेली होती.

त्यावेळी भजनी बुवांना भजनकार म्हणून गणपत म्हात्रे- पनवेल, विद्याधर पाटील- मुरुड, विश्‍वनाथ पडवळ- मुरबाड, चंद्रकांत मने- पनवेल, श्रीधर काकडे- पनवेल, भालचंद्र विशे- बदलापूर, विष्णू घरत- कर्जत यांच्या सह रायगड, ठाणे, पुणे, नवी मुंबई भागातील गजानन बुवा यांच्या शिष्यांनी भजने सादर केली. त्यांना मृदुंगमनी तसेच तबला वर वसाथ मधुकर धोंगडे- पनवेल, धनंजय बेडेकर- कर्जत, अवसरीकर- बदलापूर, महेश लघाटे- बदलापूर यांनी साथ दिली.
हा सोहळा यशस्वी होण्यासाठी स्व गजानन बुवा पाटील यांचे सुपुत्र प्रसादबुवा पाटील, सुकन्या सुचित्रा वांजळे तसेच स्मारक समितीचे रवी लाड, विजय मांडे, सुनील देशमुख, कौशिक वांजळे, अक्षय उंद्रेकर, यांच्यासह अनेक सहकारी साथ दिली.

Exit mobile version