हजारो महिलांनी लुटलं आनंदाचं वाण
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग, खालापूर येथील यशस्वी आयोजनानंतर बुधवारी (दि.24) पालीत मोठ्या उत्साहात कृषीवलचा हळदीकुंकू सोहळा पार पडला. उपस्थित हजारो महिलांनी केलेल्या पारंपरिक पेहरावाने हा सोहळा फुलून संस्कृतीशी पूर्णपणे समरस झाल्याची प्रचिती मिळाली. दरम्यान, महिलांनी घेतलेल्या एकापेक्षा एक सरस उखाण्यांमुळे कार्यक्रमाची रंगत वाढून तो आनंद देणारा ठरला. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांचे नियोजन आणि प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित महिलांनी आनंदाचं वाण लुटलं. हळदीकुंकू समारंभात सायंकाळी चार वाजल्यापासून महिला येण्यास सुरुवात झाली. बघता-बघता महिलांची अलोट गर्दी झाली. पारंपरिक पेहराव करीत दाखल झालेल्या महिलांनी हा सोहळा फुलून गेला. चित्रलेखा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांचे आगमन झाल्यावर दीप प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी लुटला. यावेळी मान्यवरांचे तुलसी वृंदावन देऊन स्वागत करण्यात आले.
या समारंभामध्ये चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, सुधागडच्या नगराध्यक्षा प्रणाली शेडगे, रोहिणी खामकर, शेकाप अलिबाग तालुका महिला आघाडी प्रमुख प्रीती पाटील, संगिता म्हात्रे, कृषीवलच्या संपादक माधवी सावंत, जाहिरात व्यवस्थापक हर्षा नाईक, दर्शना पाटील, भैरवी जाधव, समृद्धी म्हात्रे, सचिन गुप्ता, सुरेंद्र वेळे, भारती शेळके, समृद्धी यादव, भारती सागळे, अस्मिता बैकर, वर्षा सोनावणे, अस्मिता भिलारे, सुहानी जंगम, ऋतुजा मेहता, मोनिका पटेल, समृद्धी खैरे, सोनल ठकोरे, रजनी गोफण, साक्षी दिघे आदींसह पीएनपी एज्युकेशन सोसायटीची टीम, कृषीवलचे संपादकीय, वितरण जाहिरात विभागाचे कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकारी, सभासद, नगरसेवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्वागतासाठी ढोलताशासह लेझिम पथक हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने सोनी मराठी वाहिनीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेमधील पोलीस निरीक्षक विजय भोसले ही भूमिका साकारणारे अभिनेते हरिश दुधाडे, उपनिरीक्षक सीमा जमदाडे ही भूमिका साकारणारी अभिनेत्री चंद्रलेखा जोशी तसेच ‘राणी मी होणार' या मालिकेतील अभिनेत्री संचिता कुलकर्णी आणि अभिनेता सिद्धार्थ खिरीत यांचे स्वागत ढोलताशांच्या गजरासह पारंपरिक लेझिम पथकाने स्वागत करण्यात आले. यामध्ये पाली धुंडीविनायक येथील यशश्री लेझीम पथक, संत नामदेव विद्यालयातील विद्यार्थिनी यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाल्यावर महिलांनी उभे राहून कलाकारांचे स्वागत करण्यात केले. त्यानंतर त्यांचे औक्षण करण्यात आले.
सुधागडमधील दोन मुलींचा सन्मान मध्य प्रदेश येथे झालेल्या नृत्य आणि गायन स्पर्धेत सुधागडमधील वेदा यादव आणि आस्था दळवी या दोन मुलींनी सुवर्णपदक मिळवले. या दोन कर्तृत्ववान मुलींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
समृद्धी यादव, ऋतुजा मेहताची निवड शेकाप सुधागड तालुका महिला आघाडी प्रमुखपदी समृद्धी यादव आणि पाली शहर अध्यक्षपदी ऋतुजा मेहता यांची निवड करण्यात आली आहे. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या उत्साहातून एनर्जी घेऊन जातो कृषीवल आणि चित्रलेखा पाटील यांनी महिलांसाठी राबवलेला उपक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. जानेवारी महिना उजाडल्यावर कृषीवलच्या हळदीकुंकू समारंभाची आठवण येते. यंदादेखील मला या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली. या समारंभात मान्यवर म्हणून येण्याची संधी ही दुसरी वेळ आहे. मोठ्या संख्येने उपस्थित महिला पाहून आनंद झाला आहे. हीच एनर्जी घेऊन शूटिंगला जातो. हेच प्रेम कायम राहू दे, असे प्रतिपादन संचिता कुलकर्णी यांनी केले. हळदी कुंकू समारंभात पालीमध्ये येण्याची संधी मिळाली. इतक्या मोठ्या संख्येने महिलांची गर्दी पाहून खूप आनंद झाला आहे. कृषीवलचे मनापासून आभार व्यक्त करतो, असे सिद्धार्थ खिरीत म्हणाले.
दहा महिला ठरल्या उखाणा स्पर्धेतील मानकरी हळदीकुंकू कार्यक्रमानिमित्त खास महिलांसाठी उखाणा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत असंख्य महिलांनी सहभाग घेतला. प्रत्येकीने एकापेक्षा एक सरस उखाणे सादर केले. या स्पर्धेत दहा महिला मानकरी ठरल्या. त्यात डॉली ओसवाल, प्रवीणा खैरे, निहारिका शिर्के, शीतल जाधव, दिपाली ओसवाल, प्राची बेलोसे, हेमलता ठोंबरे, रिना राठोड, भोजकर आणि गणवे यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला.
समारंभातून महिलांचा सन्मान: चित्रलेखा पाटील कृषीवलने हळदीकुंकू समारंभाची 28 वर्षांची परंपरा आजही जपली आहे. दरवर्षी अनेक तालुक्यात हा सोहळा साजरा केला जात आहे. या कार्यक्रमात सर्व घटकातील महिलांचा सन्मान केला जात आहे, असे प्रतिपादन कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांनी केले. या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पालीतील सोहळ्यात महिलांची गर्दी पाहून खूप आनंद झाला. महिलांचा हा उत्साह पाहून खूप समाधान वाटले. सुरेश खैरे आणि त्यांची टीम, महिला आघाडी, कृषीवलने यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे, असेही चित्रलेखा पाटील म्हणाल्या. कृषीवल हळदीकुंकू कार्यक्रमाचा दर्जा राज्य स्तरावर पोहोचला आहे. सोनी मराठी वाहिनीचे यासाठी चांगले सहकार्य लाभले आहे. नारायण नागू पाटील यांनी 88 वर्षांपूर्वी कृषीवलची निर्मिती केली. महिलांचा सन्मान करणारे नेते होते. महिला सक्षमीकरणासाठी कृषीवलची सुरू असलेली ही चळवळ बघून आज त्यांना प्रचंड अभिमान वाटला असता. कृषीवल हळदीकुंकू समारंभ याहीपेक्षा भव्यदिव्य बनवू, अशी ग्वाही देत तुम्हा सर्वांची साथ अशीच राहू दे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.