देखभाल, दुरुस्तीचा खर्च ग्रामपंचायतींच्या माथी
| अलिबाग | प्रतिनिधी |
नळपाणी योजनांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्ची पडत असतात. जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ या योजेनेंतर्गत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दररोज 55 लीटर शुद्ध पाणी मिळणार, अशी पोकळ घोषणा केंद्र सरकारने केली. मात्र, पाणी योजनांचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च ग्रामपंचायतींच्या माथी मारण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नळजोडणी केली, पण पाण्याच्या नावाने बोंब असल्याचे समोर आले आहे. रायगड जिल्ह्यात ‘हर घर नल’ योजेनेंतर्गत 833 गावांमध्ये ही योजना पूर्ण झाल्याचा दावा संबंधित विभागाकडून करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या नळाला पाणीच येत नसल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. सरकारच्या या प्रभावी योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली का, याबाबतची सत्यता पडताळण्यासाठी काही ग्रामपंचायतींकडून माहिती घेतली असता नळजोडणी केली आहे, मात्र पाणीच नसल्याचे सांगण्यात आले.
रायगड जिल्ह्यामध्ये एक हजार 1,831 गावांपैकी 936 गावांमध्ये यापूर्वी वैयक्तिक नळ कनेक्शन शंभर टक्के देण्यात आले असून, 833 गावांमध्ये ‘हर घर जल’ योजनेंतर्गत कनेक्शन देण्यात आले आहे. करोडो रुपये खर्च करून जिल्ह्यातील अनेक भागांतील गावे, वाड्यांमध्ये या योजनांचे काम करण्यात आले. सध्या 103 गावे अजूनही या योजनेच्या प्रतिक्षेत आहेत. कोणत्याही नागरिकाला पिण्याच्या पाण्यासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही, हा उद्देश समोर ठेवून ही योजना राबविण्यात आली. या योजनेसाठी सरकारने जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात केली. नळ आहेत, मात्र पाणी नाही, अशी परिस्थिती जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये निर्माण झाली आहे. नळ कनेक्शन देऊन सहा महिने उलटत आले आहेत; परंतु नळाद्वारे घरात पाणीच पोहोचत नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यात सुरु झाल्या आहेत.
पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी राबविलेल्या योजनेमार्फत प्रत्येक घरात पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. या योजनेमुळे आरोग्याबरोबरच नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, जुन्याच पाण्याच्या स्त्रोतातून कनेक्शन जिल्ह्यात काही भागात दिले जात असून, काही धरणांमधील गाळ न काढल्याने मातीमिश्रित पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. काही ठिकाणी आठ ते दहा दिवस पाणी नळाद्वारे येत नसल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
सर्वांना मुबलक पाणी मिळावे म्हणून केंद्र सरकारने ‘हर घर जल’ योजना सुरु केली. मात्र, रायगड जिल्ह्यात ही योजना बऱ्याच ठिकाणी अपूर्ण आहे. ‘हर घर जल’ योजनेचे उद्दिष्ट साध्य होताना दिसून येत नाही. गावाच्या बाहेर पाईपचे ढीग दिसत आहे. प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात सक्षमपणे पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. घरांमध्ये पाणीच पोहोचत नसल्याने ही योजना अपयशी ठरली आहे.
पंडित पाटील, माजी आमदार
योजनांचा बट्ट्याबोळ जनतेला शुद्ध पाणी देण्यासाठी सुनियोजित कार्यक्रम राबविण्याची नितांत आवश्यकता आहे. घोषणाबाजीत अनेक पाणी योजनांचा बट्ट्याबोळ झालेला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता शुद्ध पाणी देण्याच्या आश्वासनांचा पाऊस पडेल, पण ही शुद्ध फसवणूक असेल किंबहुना कोणतेही नियोजन नसताना पाणी योजना कार्यक्रम राबविण्याचे धोरण ही निव्वळ धूळफेक असल्याचे मत नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी व्यक्त केले आहे.
हर घर जल योजनेंतर्गत ठेकेदाराकडून काम योग्य पद्धतीने झाले नाही. पाण्याची लाईन टाकण्यात आली. मात्र, पाणी घरात पोहोचले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. नियोजनाअभावी ही समस्या निर्माण झाली असून, ठेकेदारांना ब्लॅकलिस्टवर टाकण्याची मागणी केली आहे. त्यांना या ठिकाणी काम देऊ नये, असाही निर्णय घेतला आहे.
हर्षदा मयेकर, सरपंच,
नागाव ग्रामपंचायत, अलिबाग
केंद्र व राज्य सरकारच्या पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जात असल्या तरी त्या योजनांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांची असते. ग्रामस्थांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्यांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग