महाड, तळा मधील नऊ ठिकाणी घरांची पडझड
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात शनिवार पासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. रविवारी दिवसभर पाऊस सुरूच राहिला. पावसाने कहरच केला. सतत सुरू असलेल्या पावसात मोठी हानी झाली नसली तरी अनेक सखल भागात पाणी साचले. तळा, महाड तालुक्यात नऊ ठिकाणी घरांची पडझड झाली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. सोमवारी ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
रायगड जिल्ह्यात रविवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात पावसाने जोरदार एंट्री मारली. अलिबाग, कर्जत, सुधागड, माणगाव, माथेरान, पेण, उरण, श्रीवर्धन, सुधागड, म्हसळा या भागात 80 ते 102 मि.मी. इतका पाऊस पडला. सर्वात जास्त माणगांव, अलिबाग, पेण तालुक्यात पाऊस पडला. त्या खालोखाल कर्जत, तळा, मुरुड, रोहा, महाड, पोलादपूर, खालापूर अशा अनेक शहरी व ग्रामीण भागात 41 ते 80 मि. मी पाऊस पडला.
शनिवारी रात्री पासून पाऊस सुरु राहिल्याने शेतांसह अनेक सखल भाग पाण्याने भरून गेला. पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. जिल्ह्यातील अलिबाग – पेण, अलिबाग – रोहा, अलिबाग – चणेरा तसेच अलिबाग मुरुड मार्गावर असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूकीचा वेग मंदावल्याने प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहचण्यास विलंब झाला. एसटी सेवेवरही त्याचा परिणाम झाला.
सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास या प्रमुख नद्या पाण्याने भरून गेल्या. इशारा पातळी पेक्षा कमी पाणी आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या 28 धरणांपैकी 26 धरणे शंभर टक्के जलसाठा असून, श्रीवर्धन मधील कार्ले आणि रानिवली धरणात 99 टक्के जलसाठा असल्याची माहिती देण्यात आली आहे. कर्जत, अलिबाग, नागोठणे, हा भाग जलमय झाला आहे. जिल्ह्यात सोमवारी (दि. 29) ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. संभाव आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
नवरात्रौत्सवावर पावसाचे विरजन
नवरात्रौत्सव गेल्या आठ दिवसांपासून सुरू झाला आहे. गरबा नृत्यांसह भजन, जाखडी नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रमांसह धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने या कार्यक्रमांवर अडथळे येऊ लागले आहेत. त्यामुळे नवरात्रौत्सवावर पावसाचे विरजन पडल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात भात पिक तयार होण्याच्या मार्गावर आहे. कणश्या तयार होऊ लागल्या आहेत. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भातपीक संकटात आले आहे. हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रभाकर नाईक
शेतकरी
जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. या पावसात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन तत्पर आहे. सोमवारी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
सागर पाठक
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी







