| पनवेल | प्रतिनिधी |
सिडको वसाहतीमधील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 157 भूखंडाचे पालिकेकडे हस्तातंरण करण्यात आले आहे. पालिकेकडून हे भूखंड विकसित करण्याचे काम सुरु आहे. मात्र, त्याचवेळी कळंबोली आणि कामोठे वसाहतीत सिडकोने फेरीवाल्यांसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडावर विकसित केलेल्या इमारती (हॉकर्स झोन)पालिकेकडे हस्तांतरित करण्यात सिडको विभाग उदासीन असल्याचे पाहायला मिळत असून, सिडकोने करोडो रुपये खर्चून उभारलेल्या या इमारती अद्यापही धूळ खात पडून असल्याने या इमारतींचे हस्तांतरण पालिकेकडे लवकरात लवकर करावे, अशी मागणी होत आहे.
सिडकोने 2013 साली कळंबोलीमधील सेक्टर 1 येथील भूखंडावर एक मजली हॉकर्स झोनची इमारत बांधून ठेवली आहे. या इमारतीत तीनशे गाळे तयार करण्यात आले आहेत, तर कामोठे वसाहतीमधील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याकरिता सेक्टर 22 येथे हॉकर्स प्लाझाकरिता एक मजली इमारत उभारण्यात आली आहे. हस्तांतरण न झाल्याने दोन्ही इमारतींमध्ये बनवण्यात आलेले गाळे पडून आहेत.
परस्पर वाटप सद्यःस्थितीत कळंबोली वसाहतीत फेरीवल्यांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीत बनवण्यात आलेल्या ओट्याचे वाटप फेरीवाल्यांच्या संस्थांनी परस्पर केले आहे. या ठिकाणी फळ, फूल विक्रेत्यांसोबत भाजीपाल्याचा बाजार भरवला जात आहे. असे असले तरी या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना या जागा कायमस्वरुपी मिळू शकतील अशी शक्यता कमी आहे.
सिडकोचे अध्यक्ष असताना प्रमोद हिंदुराव यांनी 2016 साली कळंबोली वसाहतीला दिलेल्या भेटीप्रसंगी काही महिन्यातच हॉकर्स झोनमधील गाळ्यांचे वाटप फेरीवाल्यांना करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र, त्या घोषणेची अंमलबजावणी त्यावेळी होऊ शकली नव्हती.
सिडको वसाहतीमधील हॉकर्स झोनकरिता ठेवण्यात आलेले भूखंड पालिकेकडे हस्तांतरीत करुन घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या प्रक्रियेंतर्गत सिडको अधिकारी व पालिका अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर या इमारती पालिकेकडे लवकरच हस्तांतरित होतील, याकरिता पालिका प्रयत्न करत आहे.
जयराम पादीर, पालिका अधिकारी