विश्‍वचषकाआधीच डोकेदुखी वाढली

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएल 2024नंतर लगेच आयसीसी टी-20 वर्ल्डकपचे आयोजन होणार आहे. या वर्षी ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार असून त्याआधी भारतीय क्रिकेट संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेच्या आधी आयपीएलचा 17वा हंगाम सुरू आहे. 22 मार्च रोजी आयपीएलला सुरूवात झाली. या महिन्याच्या अखेरपर्यंत टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे. त्याआधी टीम इंडियातील अनेक स्टार खेळाडूंचा फॉर्म खराब असल्याचे दिसत आहे. 2007 साली झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्डकपचे भारताने विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर भारताला टी-20 वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. अशात या वर्षी भारतीय संघात असणारे पाच खेळाडू ज्यांचा फॉर्म आयपीएलमध्ये खराब आहे.

1) जितेश शर्मा-
पंजाब किंग्जचा विकेटकीपर आणि फलंदाज जितेश शर्मा ही टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील दावेदार आहे. पण 4 लढतीत जितेशला 15च्या सरासरीने आणि 126च्या स्ट्राइक रेटने 58 धावा करता आल्या. सध्या ऋषभ पंत देखील फिट झाला असून मैदानावर परतला आहे. तो धावा देखील करतोय. जर जितेशची कामगिरी चांगली झाली नाही तर पंतला वर्ल्डकपचे तिकीट मिळू शकते.

2)रविंद्र जडेजा- चेन्नई सुपर किंग्जचा ऑलराउंडर रविंद्र जडेजा धावा करतोय पण त्याला विकेट मिळत नाहीय. 4 मॅचमध्ये जडेजाला फक्त 1 विकेट मिळवता आली. फलंदाजी देखील तो फिनिशरची भूमिका पार पाडताना दिसत नाहीय. आयपीएल 2024 मध्ये जडेजाने 60 चेंडूत फक्त 1 षटकार मारला आहे.

3)हार्दिक पंड्या- वनडे वर्ल्डकप दरम्यान दुखापत झाल्याने हार्दिक अनेक महिने मैदानाबाहेर होता. त्यानंतर डीवाय पाटील टी-20 स्पर्धेत खेळला. आयपीएलच्या या हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार्‍या हार्दिकला आतापर्यंत काही खास कामगिरी करता आलेली नाही. 3 सामन्यात त्याने फक्त 69 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत 11च्या इकोनॉमीने धावा देत फक्त 1 विकेट घेतली आहे.

4) यशस्वी जयस्वाल- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धमाकेदार फलंदाजी करणार्‍या यशस्वीला आयपीएल 2024 मध्ये धावा करता आल्या नाहीत. त्याने 3 लढतीत 13च्या सरासरीने 39 धावा केल्या आहेत. यातील 24 धावा एका लढतीत केल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये यशस्वी रोहित शर्मासोबत सलामीला येऊ शकतो. अशात त्याच्या आयपीएलमधील कामगिरीवर सर्वांची नजर असेल.

5) मोहम्मद सिराज- टी-20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह सोबत मोहम्मद सिराजच्या हाती नवा चेंडू असेल. मात्र सध्या आयपीएलमध्ये त्याची कामगिरी खराब दिसत आहे. 4 मॅचमध्ये त्याला फक्त 3 विकेट मिळाल्या आहेत. तर त्याने 10 पेक्षा अधिक इकोनॉमीने धावा दिल्या आहेत.

Exit mobile version