गणेशोत्सवात प्रवासी, नागरिक मेटाकुटीला
| माणगाव | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवार-रविवारची सुट्टी आल्याने शनिवारी मुंबई बाजूकडून कोकणात जाणारी तर रविवारी कोकणातून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या कोकणवासीय गणेशभक्तांना मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव शहरात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीची समस्या उफाळून आली. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या प्रचंड वाहन ताफ्यामुळे तसेच पर्यटकांच्या मोठ्या गर्दीमुळे शहरातील रस्ते ठप्प झाले. या कोंडीचा फटका कोकणवासीय गणेशभक्त, प्रवासी, स्थानिक नागरिक, पर्यटक आणि व्यापाऱ्यांना बसला आहे. माणगावकरांच्या नशिबी वाहतूक कोंडीची डोकेदुखी कायम राहणार असून, ऐन उत्सवात नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
महामार्गावरील माणगाव हे प्रमुख बाजारपेठ असलेले शहर असून, येथे बाजारपेठेतून जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहनांची मोठी रांग लागते. महामार्गावरील वाहतूक जसजशी शहरात वळते, तसतसे शेकडो वाहनांचा तांडा बाजारपेठेत अडकतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ दुपटीने वाढत असून, प्रवासी हैराण झाले आहेत. गणेशभक्तांना कोकणात पोहोचण्यासाठी तासंतास अडकून बसावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनाही दैनंदिन कामकाजासाठी व खरेदी व्यवहार करण्यासाठी बाहेर पडताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. गौरी गणपती सणासुदीचे दिवस असल्याने नागरिक याच बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांची बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी आणि त्यात महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या रांगा यामुळे चांगलीच दमछाक होत आहे.
या वाहतूककोंडीमुळे स्थानिक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर या समस्येचा थेट परिणाम जाणवत आहे. अरुंद रस्त्यामुळे बाजारपेठेत गाड्या अडकतात, त्यामुळे खरेदीसाठी आलेले ग्राहक अस्वस्थ होऊन परत फिरतात. दुकानदारांच्या उलाढालीवर थेट परिणाम होत असल्याने व्यापारीवर्गात नाराजी वाढली आहे. त्यातच उत्सवकाळात वाढलेल्या गर्दीमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून बाजारपेठेतून जावे लागते. वाहतूक पोलीस व प्रशासनाकडून काही प्रमाणात वाहतूक नियंत्रित करण्याचे प्रयत्न होत असले तरी मूलभूत समस्या म्हणजे रस्त्याची अरुंद रचना आणि शहरातून जाणारा महामार्ग हा मुद्दा कायम आहे. जोपर्यंत इंदापूर आणि माणगाव शहराच्या बायपासचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हा तिढा कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिक व प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर वाढला असून, लवकरात लवकर पर्यायी मार्गाची व बाजारपेठेत रस्ते रुंदीकरणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.







