अनधिकृत गोदामांची चौकशी करण्याची मागणी
| उरण | वार्ताहर |
उरण-बोरी पाखाडी येथे शुक्रवारी लागलेली आग अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतरही शनिवारी चोवीस तास धूमसतेय. ही आग भीषण असल्याने ती विझविण्यासाठी 4 लाख लीटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर करण्यात आला आहे. या आगीमुळे परिसरातील नागरिकांना धुरासह रात्रभर अंधाराचाही सामना करावा लागला आहे. आग लागलेल्या गोदामाच्या परिसरात थेट अग्निशमन वाहन जाऊ शकत नसल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या छतावर चढत ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. तर शहरातील एका विहिरीतून तसेच जलवाहिनीतील पाण्याचा वापर करून ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
उरण तालुका हा ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेला तालुका आहे. या तालुक्यात केंद्र व राज्य सरकारचे नौदल शस्त्रागार, ओएनजीसी, भारत गॅस, विद्युत वितरणसह इतर केमिकल पुरवठा करणारे खासगी प्रकल्प आहेत. अशा महत्त्वाच्या तालुक्यातील सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदाम मालकांनी आपापली भंगार, केमिकल साहित्य साठवणूक करणारी भंगाराची गोदामे शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेच्या आशीर्वादाने सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे वारंवार या ठिकाणी आगी लागण्याच्या घटनेत वाढ होत आहे.
शुक्रवारी उरण-बोरी पाखाडी येथील नागरी वस्तीत असलेल्या भंगाराच्या गोदामाला आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली. सदर आग अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतरही शनिवारी चोवीस तास धूमसत होती. ही आग भीषण असल्याने ती विझविण्यासाठी 40 टँकरमधून 4 लाख लीटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर करण्यात आला आहे. या आगीमुळे परिसरातील नागरिकांना धुरासह रात्रभर अंधाराचाही सामना करावा लागला आहे. आग लागलेल्या गोदामाच्या परिसरात थेट अग्निशमन वाहन जाऊ शकत नसल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या छतावर चढत ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. तर शहरातील एका विहिरीतून तसेच जलवाहिनीतील पाण्याचा वापर करून ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. यावेळी उरणचे आमदार महेश बालदी, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, नरेश रहालकर, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील, दिनेश घरत तसेच सिडको, जेएनपीए बंदर, ओएनजीसी, एनएडीसारख्या प्रकल्पांतील अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर आग आटोक्यात आणण्यासाठी चोवीस तास प्रयत्न केले. आज पुन्हा एकदा उरणकरांच्या जनतेला मोठ्या संकटातून बाहेर काढण्यास यश आले असले तरी अशा अनधिकृत भंगाराच्या गोदामामुळे ज्वालामुखीच्या तोंडावरील उरणच्या जनतेला भविष्यात ओढवणाऱ्या संकटातून बाहेर कोण काढणार? हा प्रश्न उभा राहिला आहे.
