उन्हाची दाहकता शहरांसाठी चिंताजनक

रुपाली केळस्कर

दरवर्षी सरासरी तापमान वाढत आहे. त्याच्या झळा सर्वच घटकांना बसत आहे; परंतु वाढत्या उन्हाचा त्रास शहरांना जास्त होत आहे. उष्णतेच्या लाटांचा परिणाम तात्कालिक नसतो तर प्रदीर्घ काळ टिकणारा असतो. या लाटांनी शहरांमधल्या 17 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. जागतिक तापमानवाढीचा फटका शहरांना बसणार आहे. काही शहरं पाण्याखाली जाणार, हा भाग वेगळा.

यंदा देशात उन्हाळ्याची चाहूल वसंत ऋतूतच जाणवली. तेव्हापासून उत्तर भारतातल्या शहरांमधलं तापमान सामान्यपेक्षा जास्त राहिलं आहे. भारतात खूप उष्ण हवामान आहे हे सर्वज्ञात आहे. काही राज्यं त्याला अपवाद असतील. या उष्णतेने गेल्या सुमारे 50 वर्षांमध्ये देशात 17 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. 1971 ते 2019 या कालावधीत उष्णतेच्या लाटेच्या 706 घटना घडल्या. गेल्या पाच वर्षांमध्ये अतिउष्णतेच्या घटना अकाली घडत असून त्यांचा फटका दीर्घकाळपर्यंत बसत राहणार आहे. अनियोजित शहरीकरणामुळे उष्णतेच्या लाटांना खतपाणी मिळालं आहे. गेल्या जनगणनेनुसार, भारतातली 31.1 टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहते. 37 कोटी 70 लाख लोक शहरात राहतात. 2050 पर्यंत आणखी 40 कोटी लोक शहरांमध्ये स्थलांतरित होतील, असा अंदाज आहे. अशा स्थितीत शहरांच्या वाढत्या तापमानामुळे पर्यावरणाच्या संकटात भर पडेलच; शिवाय सामाजिक-आर्थिक विषमताही वाढेल. वास्तविक, उष्णतेचा परिणाम केवळ शरीरावर होत नाही, तर माणसाच्या कार्यक्षमतेवरही होतो. पाण्याची-विजेची मागणी वाढते आणि उत्पादन खर्चही वाढतो. शिकागो विद्यापीठाच्या एका संशोधनात दिसून आलं आहे की, 2100 पर्यंत जगात उष्णतेचा प्रादुर्भाव इतका जास्त असेल की महामारी, रोग, संक्रमण यापेक्षा जास्त लोक अतिउष्णतेने आणि प्रदूषणाने मरतील. हरितगृह वायूंचं उत्सर्जन लवकर नियंत्रित न केल्यास आजपासून 70-80 वर्षांनी जग आपल्या राहण्यास योग्य राहणार नाही. 2100 पर्यंत जगातल्या प्रत्येक एक लाख मृत्युपैकी 73 मृत्यू हे उष्णतेमुळे होणार आहेत. त्याचा फटका शहरांनाच अधिक बसणार आहे. हेदेखील चिंताजनक आहे. कारण ही संख्या एड्स, मलेरिया आणि ताप यांच्या एकत्रित मृत्यूंच्या बरोबरीची आहे.
शहरांमधलं तापमान वाढण्याची अनेक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शहरांमध्ये असलेला हिरवळीचा अभाव. काही शहरांनी हिरवाईच्या छताचा विस्तार केला असल्याचा दावा केला जात असला तरी वास्तव हे आहे की या महानगरात लावलेली बहुतेक झाडं ही पारंपरिक उंच झाडांऐवजी लवकर वाढणारी झुडपं आहेत, ज्यांचा प्रदूषण कमी करण्यासाठी तसंच वाढतं तापमान रोखण्यासाठी फारसा उपयोग होत नाही. खरं तर, मोठ्या झाडांमुळे बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन होतं, जे पृथ्वीच्या वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवतात. शहरांमधल्या दुभाजकावरील हिरवळ पृथ्वीच्या थंड होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत कोणतीही भूमिका बजावत नाही. महानगरांमधल्या गगनचुंबी इमारतीही वातावरण तप्त करत आहेत. या इमारती सूर्याच्या उष्णतेपासून परावर्तित उष्णता शोषून घेतात. याशिवाय एकमेकांपासून जवळ असलेल्या अनेक उंच इमारतीही हवेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतात. त्यामुळे थंड वातावरण तयार होण्यात अडथळा निर्माण होतो. शहरातल्या रस्त्यांचं तापमानही वाढत आहे. रस्ते प्रथम उष्णता शोषून घेतात आणि नंतर वातावरणाचं तापमान कमी झाल्यानंतर रस्त्याची उष्णता बाहेर पडते. काँक्रिटची उष्णता क्षमता खूप जास्त आहे. काँक्रिट हे उष्णतेचं भांडार म्हणून काम करतं.
याव्यतिरिक्त, शहरांवरील वातावरणीय परिस्थितीमुळे अनेकदा शहरी हवा जमिनीच्या पृष्ठभागाजवळ अडकते. हा गरम शहरी पृष्ठभाग हवा आणखी गरम करतो. शहरांना भट्टी बनवण्यात माणूसही मागे नाही. वाहनं आणि इमारतींमध्ये बसवलेले पंखे, संगणक, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर यासारखी विद्युत उपकरणं मानवाला आनंद देतात; पण शहरांचं तापमान वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. हरितगृह वायूंचं उत्सर्जन लवकर नियंत्रित केलं नाही, तर आजपासून 70-80 वर्षांनी जग आपल्याला राहण्यास योग्य राहणार नाही. शहरांपासून 50 किलोमीटर दूर असलेल्या गावात गेल्यास उष्णतेचा कडाका फारसा जाणवत नाही. उन्हाळा आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येतो. जैविक घटक कोणत्याही नदीच्या शुद्धतेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. शहरांची दाट लोकसंख्या हे संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराचं सोपं माध्यम आहे. तिथलं दूषित पाणी किंवा हवा माणसाला आतून खात राहतं. देशातल्या सर्वच मोठ्या शहरांना सध्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची समस्या भेडसावत आहे. वाढत्या तापमानात ही सर्व आव्हानं अधिक बिकट होतात.
शहरांना उष्णतेपासून वाचवायचं असेल, तर अधिकाधिक पारंपरिक झाडं लावणं आवश्यक आहे. यासोबतच शहरांमधून वाहणार्‍या नद्या, तलाव स्वच्छ राहिल्यास वाढलेली उष्णता शोषून घेतील. याशिवाय कार्यालयीन वेळेत बदल, सार्वजनिक वाहतुकीला चालना, पर्यावरणपूरक बहुमजली इमारती, ऊर्जा साठवण हे असे काही उपाय आहेत, ज्यामुळे अतिशय कमी खर्चात शहरांना भट्टी बनण्यापासून वाचवता येईल. मानवाला प्रगतीच्या पायर्‍या चढवणारी वाढती औद्योगिक क्रांतीच आता माणसाच्या मुळावर येत आहे. त्यामुळेच जगभरातल्या वाढत्या तापमानाचा प्रश्‍न सध्या भेडसावत आहे. यंदा तर ‘वाढत्या तापमानापासून सावध राहा’ असा सरकारला इशारा द्यावा लागला. आपल्यासाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. मानवाने विकासाच्या नावावर नैसर्गिक संसाधनं संपवली आणि निसर्गाला जिंकण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं, याची प्रचिती सध्या आपल्याला येत आहे. प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, हवामानबदल, विरळ ओझोन थर, समुद्रसपाटीत वाढ, नैसर्गिक आपत्ती आणि यातून होणारं प्रचंड आर्थिक नुकसान अशी कडू फळं आपण चाखत आहोत. ज्या जंगलांनी आपल्याला जन्म दिला, ज्या हवा, पाणी आणि वृक्षांनी आपल्याला जगवलं, तेच आता आपण नष्ट करायला निघालो असून आपल्याच हाताने आपल्याच अंगावर कुर्‍हाड चालवत आहोत. स्वतःला बुद्धिमान आणि ‘विज्ञानयुगात वावरतो’ अशी घमेंड मारणार्‍या मानवाला साधं निसर्गाचं गणित समजू शकलेलं नाही.
सर्वत्र घनदाट जंगलं तोडून कारखाने उभारले जाऊ लागले, शहरं वसू लागली. कारखान्यातून निघणार्‍या धुराकडे आपण प्रगतीचं आणि समृद्धीचं लक्षण म्हणून पाहू लागलो. ही निसर्गाची अंदाधुंद नासधूस मानवाच्या विकासासाठी आहे, असं आपण समजू लागलो; परंतु हाच विकास भविष्यात विनाशासाठी कारणीभूत ठरेल अशी आपल्या अविचारी सरकारांना कल्पनाही आली नाही. जागतिक तापमानवाढीवर दरवर्षी चर्चा होतात, परिषदा होतात. त्यात काही निर्णय होतात. तापमानवाढीला आळा घालण्यासाठी काही कृती कार्यक्रम ठरतो; परंतु त्याची खरंच प्रामाणिकपणे अंमलबजावणी होते का, हा खरा प्रश्‍न आहे. जगभर वाढलेल्या कारखान्याचा धूर आकाशापर्यंत पोहोचला. जंगलतोडीमुळे जमीन तापली आणि एक शतकानंतर आपल्याला कळलं की, पृथ्वीचं तापमान वाढत आहे. खर्‍या अर्थाने 1950 पासूनच पृथ्वीचं तापमान वाढत गेलं आणि 2015-2016 हे 135 वर्षांमधलं सर्वात उष्ण वर्ष ठरलं. 2022 ने तर त्यावर मात केली. विसाव्या शतकात 57 अंश फॅरनहाईट या तापमानाच्या तुलनेत 2001 ते 2014 पर्यंत 1.24 फॅरनहाईट ही वाढ प्रचंड होती. ही वाढ अशीच राहिली तर 2100 पर्यंत 4.7 ते 8.6 अंश इतकी वाढ अपेक्षित आहे.
2 डिसेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झालेल्या वैज्ञानिक अहवालातल्या नव्या आकडेवारीनुसार गेल्या दोन दशकांपासून कर्बवायू उत्सर्जनात 60 टक्के एवढी प्रचंड वाढ झाली असून तापमान 0.8 अंशानं वाढलं आहे. समुद्रसपाटीत तीन इंचानं वाढ झाली आहे तर नैसर्गिक संकटात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक सरासरी तापमानवाढ होते, त्याचा परिणाम पृथ्वीवर सर्वत्र जाणवतो; परंतु प्रादेशिक भौगोलिक कारणांमुळे सुद्धा तिथल्या तापमानात वाढ होते. खडकाळ आणि वाळूच्या भागात दिवसाचं तापमान जास्त असतं. ज्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणि प्रदूषण आहे, तिथे तापमान जास्त असतं. विदर्भात नागपूर आणि चंद्रपूरसहित अनेक शहरांचं तापमान जास्त असतं. शहरीकरण हेसुद्धा तापमानवाढीसाठी कारणीभूत आहे. शहरात काँक्रिटच्या लहान-मोठ्या इमारती तापून रात्रभर उष्णता बाहेर सोडत असतात. यामुळे शहरांचं दिवसा आणि रात्रीचं तापमान वाढतं. हे तापमान ग्रामीण आणि जंगली भागापेक्षा दोन ते तीन अंशांनी जास्त असतं. थर्मल इमेजिंगमध्ये ते बेटासारखं दिसतं म्हणून त्याला ‘अर्बन हिट आयलंड’ असं म्हणतात. हे कमी करण्यासाठी वृक्षलागवड करणं, घरांना पांढरा रंग देणं इत्यादी उपाय करता येतात.

Exit mobile version