चारफाटा येथील हायमास्ट सुरु

| उरण | वार्ताहर ।

उरण शहरातील महत्वाचे ठिकाण असलेल्या चारफाटा येथील हायमास्ट मागील महिन्याभरापेक्षा अधिक काळ बंद होता. तो सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाला आहे. त्यामुळं उरणमधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

उरणच प्रवेशद्वार असलेल्या चारफाट्यावरील रस्ता रुंदीकरणाचे व सुशोभीकरणाचे काम सिडकोने केले आहे. यामध्ये सिडकोने रुंदीकरण केलेल्या या चौकात हायमास्टचा दिवा लावण्यात आला होता. मात्र, या दिव्याला महावितरण कंपनीकडून अधिकृत जोडणी मिळालेली नव्हती. त्यामुळे दिवा लागल्या नंतर काही दिवसातच तो बंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत होता. याच चौकातील अंधारामुळे रात्रीच्या वेळी झालेल्या अपघातात एक 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चौकात विजेची आवश्यकता होती. यासाठी नागरिकांकडून सिडकोकडे वारंवार मागणी करून ही दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. या संदर्भात सिडकोने हायमास्टचे देयक (वीज बिल)ची जबाबदारी ओएनजीसीकडे असल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान चारफाट्यावरील दिव्याची समस्या दूर होऊन सोमवारी हा दिवा पुन्हा एकदा सुरू झाल्याने येथील अनेक दिवसांचा अंधार फिटला आहे.

Exit mobile version