। उरण । वार्ताहर ।
सिडकोच्या माध्यमातून अभियंता मुंडे व ठेकेदार आर. के. पाटील यांच्या माध्यमातून उरण चारफाटा येथे हायमास्ट दिवे लावण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिवे सुरू करण्यात आले. या हायमास्ट दिव्यांचे उद्घाटन उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांच्या हस्ते करण्यात आले. उरण चारफाटा येथे सर्कल बांधून हायमास्ट दिवा व गतिरोधक बसविण्याची मागणी सिडकोकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. त्यानंतर सिडकोचे अभियंते मुंडे व ठेकेदार आर. के. पाटील, शिरीष कडू यांनी अडचण लक्षात घेत त्वरित गतिरोधक बसविले. त्यानंतर काही दिवसात सर्कल व हायमास्ट दिवा लावण्याचे आश्वासन दिले होते.
त्याप्रमाणे सर्कल बांधून हायमास्ट दिवे लावण्यात आले होते. काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्याकाळ पर्यंत ठेकेदारांच्या कर्मचार्यांनी रात्री 9.30 वाजेपर्यंत मेहनत घेत काम पूर्णत्वास नेत हायमास्ट दिवे सुरू करण्यात आले. हायमास्ट दिव्यांचे उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आले. यावेळी भाजपाचे जितेंद्र घरत, शिवसेनेचे एस. के. पुरो, आरपीआयचे प्रकाश कांबळे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप कडू, विरेश मोडखरकर व इतर उपस्थित होते.