रेल्वे आणि महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष
। माणगाव । वार्ताहर ।
गेली चार दिवस पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने मुंबई गोवा महामार्गावरील ढालघर गावाजवळील रेल्वे पुलाखालून जाणार्या या महामार्गावर पाणी साचत आहे. येणार्या जाणार्या वाहन चालकांना हा रस्ता दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची जास्त शक्यता आहे.
माणगाव पासून तीन कि.मी अंतरावर ढालघर गावाजवळ कोकण रेल्वे मार्ग जातो या कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने पूल उभारला असून त्या पुलाखालून मुंबई गोवा महामार्ग गेला आहे. कोकण रेल्वे आपल्या गावाजवळ जात असल्याने आपला विकास होईल या उद्देशाने येथील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात चाळीस वर्षांपूर्वी कोकण रेल्वेला कवडी मोल किंमतीत जमिनी दिल्या. त्यावेळी कोकण रेल्वेने ट्रॅक टाकण्यासाठी मातीचे मोठ्या प्रमाणात भराव केले. त्यामुळे वर्षानुवर्ष पडणारे पावसाच्या पाण्याचे नदीकडे जाणारे मार्ग बंद झाले. पावसाचे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने ते ठिकठिकाणी तुंबले आहे. रेल्वे पुलाखालून जाणार्या महामार्गाचे दोन्ही बाजूंनी पाण्याचा निचरा होण्यासाठी रेल्वे प्रशासन किंवा महामार्ग प्रशासनाने गटार खोदणे गरजेचे होते. मात्र दोन्ही प्रशासनाने पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. या तुंबलेल्या पाण्यामुळे ढालघर ग्रामस्थांची शेती ही संकटात सापडली आहे.
गेली चार दिवस सतत पडणार्या अतिवृष्टीमुळे या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले आहे. एका बाजूला कोकण रेल्वे मार्गाच्या भरावामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे हे पावसाचे पाणी महामार्गावरून वाहत आहे. मुंबई गोवा महामार्ग हा सतत रहदारीचा असल्याने महामार्गावर विशेषतः पावसाळ्यात जास्त अपघाताचे प्रमाण वाढत आहे. महामार्गावरून हे पाणी वाहत असल्याने वाहनचालकांना रस्ता दिसत नाही. याबाबत ढालघर ग्रामस्थांनी संबंधित अधिकार्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रेल्वे व महामार्ग प्रशासनाने या गंभीर प्रश्नांकडे डोळेझाक चालवल्याने ढालघर येथील काही ग्रामस्थ व माणगाव येथील मंगेश मेहता यांनी आपल्या स्वखर्चाने जेसीबीच्या सहाय्याने महामार्गालगत असणार्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चर काढून साठलेल्या पाण्याला रस्ता मोकळा करून दिला. मंगेश मेहता यांनी सामाजिक जाणवेतून केलेल्या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. मात्र रेल्वे आणि महामार्ग प्रशासनाने वर्षानुवर्ष चालवलेली डोळेझाक याबाबत परिसरातील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त होत आहे.