पनवेलमध्ये साकारतंय ‌‘हिरकणी’ रुग्णालय

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेच्या स्वमालकीचे पहिले बहुविशेषज्ञ रुग्णालय ठरणाऱ्या ‌‘हिरकणी माता बालसंगोपन’ रुग्णालयाच्या बांधकामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. सुमारे 153 कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येणारे हे 400 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय जून 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पनवेलकरांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

नवीन पनवेलमधील सेक्टर 18 येथील प्लॉट क्रमांक 8-अ आणि 8-ब या भूखंडावर दहा मजली रुग्णालय उभारले जात आहे. मे. आर.आर. तुळशी बिल्डर्स प्रा.लि. या कंपनीला दि. 4 डिसेंबर 2025 रोजी कार्यादेश देण्यात आला होता. मात्र, पर्यावरण विभागाची परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने प्रत्यक्ष काम दि.18 एप्रिलनंतर सुरू झाले. सध्या भूखंडावर खोदकामाचे काम सुरू आहे. सुमारे साडेसात हजार चौरस मीटर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयात 100 आयसीयू खाटा, 45 एनआयसीयू खाटा, एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे, मेमोग्राफी, सोनोग्राफी तसेच प्रसूतीसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष अशी आधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहे. याशिवाय 136 चारचाकी आणि 451 दुचाकींसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या दहा लाखांच्या पुढे गेल्याचा अंदाज असताना महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय नसल्याची उणीव या प्रकल्पामुळे भरून निघणार आहे. रुग्णालयाचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून प्रत्येक तीन महिन्यांचा कामाचा आराखडा मागविण्यात आला आहे, अशी माहिती पनवेल महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांनी दिली.

Exit mobile version