। पनवेल । प्रतिनिधी ।
इतिहासाचा साक्षीदार असलेला पनवेलनजीकचा कर्नाळा किल्ला आता अखेरची घटका मोजू लागला आहे. सुळक्यासह बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. तर, किल्ल्याच्या भिंतींना भेगा गेल्या असून पायर्या आणि प्रवेशद्वार ढासळला असल्याने किल्ल्यावरील परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे.
सुमारे साडेतीन किलोमीटरचा टप्पा असलेल्या कर्नाळा अभयारण्यात अंगठ्याच्या आकाराचा उंच मोठा सुळका दिसून येतो. महामार्गावरुन दिसणारा सुमारे 50 मीटर उंचीचा हा पांडव सुळका पर्यटकांसाठी आकर्षण बनला आहे.
किल्ल्याच्या वरच्या टप्प्यात सुळका, पाण्याच्या टाक्या आणि ऐतिहासिक बांधकामे आहेत. त्या बांधकामांना धोका निर्माण झाला आहे. तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे. प्रवेश केल्यावर वाड्यांचे अवशेष दिसून येत असून त्याची स्थिती बिघडली आहे. त्यामुळे किल्ल्याला दुरुस्तीची गरज आहे.
कर्नाळा किल्ल्यावर पाहणीसाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचार्यांना किल्ल्यावर जाणार्या पायर्या सुस्थितीत नसल्याचे लक्षात आले. तर, पायर्या चढून गेल्यावर पुढे असलेल्या दगडी दरवाजाच्या भिंती देखील सरकल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वन्यजीव विभागामार्फत या परिसरात सूचना फलक लावून वरच्या टप्प्यातील सुमारे 500 मीटर अंतराच्या परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही पुरातत्व विभागाची आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने ही बाब गाभीर्याने न घेतल्यास किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऐतिहासिक कर्नाळा मोजतोय अखेरची घटका; पर्यटकांना फिरण्यास बंदी
