प्रशासनाकडून जाण्यास मज्जाव; कारवाईचा इशारा
| पनवेल | राजेश डांगळे |
गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध असलेल्या पनवेल तालुक्यातील ‘प्रबळगडा’चा दगडी सुळका सैल झाल्याचे समोर आले आहे. सागर मुंडे या गिर्यारोहकाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याने याबाबत जिल्हा आपत्ती निवारण कक्षाला माहिती दिली. यानंतर खबरदारी म्हणून गडावर जाण्यास प्रशासनाने प्रतिबंध घातला आहे.

माथेरान पर्यटनस्थळाच्या पश्चिमेला पनवेल तालुक्यातील ‘प्रबळगड’ हे गिर्यारोहकांचे आवडीचे ठिकाण आहे. याठिकाणी वर्षाकाठी हजारो गिर्यारोहक या प्रबळगडाला भेट देत असतात. माथेरान डोंगररांगां मध्ये असणारा प्रबळगड गिरीदुर्ग प्रकारातील एक किल्ला आहे. सततच्या पावसामुळे किल्ल्यावरील पायऱ्या शेवाळामुळे निसरड्या झाल्या आहे. या किल्ल्यावर गेलेल्या सागर मुंडे नावाच्या गिर्यारोहकाने येथील दगडी सुळका सैल होत चालल्याची तक्रार येथील रायगड जिल्हा अपत्कालीन कक्षाला दिली. याची दखल घेत पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी घेतली असून, किल्ल्यावर जाण्यास बंदी घातली आहे. तसेच किल्ल्यावर जाणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे.
म्हणून गिर्यारोहकांची पसंती
समुद्र सपाटीपासून दोन हजार 300 फूट उंचीवर असलेल्या किल्ल्याच्या तिन्ही बाजूंना स्थानिक किल्ले आहेत; तर एका बाजूला नद्यांचा प्रवाह आहे. पनवेलपासून जवळच हा किल्ला असल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे परिसरातील गिर्यारोहकांचा या किल्ल्याकडे ओढा असतो. किल्ल्यावर एक दगडी सुळका असून, त्याच्या खोबणीत पायऱ्या कोरल्या आहेत. या पायऱ्यांच्या आधारावरून दोराच्या साह्याने सुळक्यावर जाता येते. दगडी सुळका आणि शेजारचे डोंगर यादरम्यान दोन हजार फूट उंचीची खोल दरी आहे. पावसाळ्यात ही दरी दाट धुक्याने वेढून जाते.