| रायगड | प्रतिनिधी |
अलिबाग येथील अवघ्या 7 वर्षांच्या सारा अभिजीत वर्तक हिने आपल्या अद्वितीय जिद्द आणि धैर्याच्या जोरावर जागतिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 9 डिसेंबर 2025 रोजी साराने अरबी समुद्रात धरमतर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे अत्यंत आव्हानात्मक तब्बल 36 किमी अंतर एकट्याने अवघ्या 9 तास 32 मिनिटांत पोहत पूर्ण करत सर्वात लहान वयाची जलतरणपटू म्हणून इतिहास रचला.
आता तिच्या या पराक्रमाची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांनी घेतली असून ,30 एप्रिल 2026 रोजी नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार समारंभात साराला ‘धरमतर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे 36 किमी अंतर पोहून पूर्ण करणारी सर्वात लहान भारतीय जलतरणपटू’ म्हणून अधिकृत नोंद करून गौरविण्यात आले. तिच्या या यशामागे तिची चिकाटी, सातत्यपूर्ण सराव आणि प्रशिक्षक रुग्वेद पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. सध्या सारा पनवेल येथे राहत असून प्रशिक्षक रुग्वेद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ती कठोर प्रशिक्षण घेत आहे. भविष्यात आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा तिचा निर्धार आहे. यापूर्वीही सारा वर्तकच्या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली आहे. इतक्या लहान वयात मिळवलेले हे यश तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.







