| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नेपाळमधील काठमांडू युनिव्हर्सिटी, धुलीखेल येथे पार पडलेल्या 7 व्या आशियाई व इंटरनॅशनल सवात चॅम्पियनशिप मध्ये भारतीय खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा अभिमानाने फडकवला.
या स्पर्धेत भारताकडून एकूण 71 खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये महाराष्ट्रातील 24 खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 15 कांस्य पदके जिंकली. विविध राज्यातील खेळाडूंच्या एकत्रित योगदानामुळे भारताने आशियाई स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पटकावण्याचा बहुमान मिळवला. महाराष्ट्राच्या गार्गी कुलकर्णी आणि अंजली चव्हाण यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर आकांक्षा भालेकर, आर्या पवार, समृद्धी जुगदार, शिवम पाटील, श्रुतिका जाधव, वैष्णवी शिंदे आणि सार्थक महामुनी यांनी रौप्य पदके पटकावली. तसेच ऐश्वर्या नायक, अस्मि पाटील, वरद शेटे, मकरंद जुगदार, ध्रुव दिघाडे, अविर बनसोडे, प्रमोद ठोंबरे, आदित्य खंडीझोड, यश मोरे, ध्रुव कोलतेकर, ईश्वरी डेरे आणि स्वयम् शिंदे यांनी कांस्य पदक जिंकून देशाचे नाव उंचावले. महिमालयन इंटरनॅशनल सवात चॅम्पियनशिपमध्ये सिद्धी जोगदार, मंथन रोटे आणि आराध्या भोसले यांनी कांस्य पदकाची कमाई केली.







